दरवर्षी काँ. भास्करराव जाधव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिला जाणारा राज्यव्यापी अभिवादन पुरस्कार यावर्षी मराठवाड्याच्या जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मंगल खिंवसरा व महाराष्ट्रातील कष्टकरी चळवळीचे कार्यकर्ते काँ. शांताराम पंदेरे या दाम्पत्यास प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याची माहिती देणारा रवींद्र चिंचोलकर यांचा लेख येथे देत आहोत.
ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्या हस्ते संभााजीनगर ( छ. संभाजीनगर ) येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ऍड. बी .एच.गायकवाड होते. कॉम्रेड भीमराव बनसोड लिखित ‘जय भीम लाल सलाम कॉम्रेड’ या पुस्तकाचे प्रकाशन या समारंभात करण्यात आले.
कॉम्रेड भास्करराव हे कट्टर साम्यवादी पूर्णवेळ कार्यकर्ते होते तसेच ते दैनिक श्रमिक विचार पुण्याचे संपादक ,कवी ,लेखक लोकसाहित्यिक व विविध विषयांचे गाढे अभ्यासक होते .असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी मोठे काम त्यांनी उभे केले. त्यांच्या नावे दरवर्षी पुरस्कार दिला जातो. मानपत्र भेटवस्तू व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .
शांताराम पंदेरे यांनी युक्रांद चळवळीत काम केले आहे. दुष्काळ, रोजगार ,दलित, आदिवासी, भटके – विमुक्त, गायरान व वन हक्क जमीन चळवळीत गेली 50 वर्षे ते पूर्ण वेळ कार्यरत आहेत. भारिप – बहुजन महासंघ व बहुजन वंचित बहुजन आघाडी यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पाक्षिक प्रबुद्ध भारत मध्ये ते नियमित लेखन करतात. आजपर्यंत अनेकदा चळवळीसाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आहे. लाल निशान पक्षाशीही त्यांचा जुना संबंध आहे ..मंगलताई व काँ.शांताराम पंदेरे हे कॉम्रेड भास्करराव यांच्या तरुणपणापासून सहवासात होते
मंगल खिंवसरा गेली 40 वर्षे ग्रामीण कामगार कष्टकरी आदिवासी यांच्या कार्यात अग्रेसर असून ‘भारतीय लोक पर्यावरण विकास संस्था’ औरंगाबाद यांच्या अध्यक्ष आहेत. मराठवाडा वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. नामांतर, मंडल आयोग चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. .भटक्या विमुक्त महिलांच्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी लढे उभारले आहेत. सुमारे 300 आदिवासी व बाराशेच्या वर बौद्ध, मातंग, चर्मकार, बंजारा, ख्रिश्चन कुटुंबांना सुमारे 2000 एकरच्या गायरान जमिनीवर जमीन हक्क मिळवून देण्यात त्यांना यश मिळाले. महिला सुरक्षा समितीत त्यांचे मोठे योगदान असून विविध नियतकालिकात त्यांचे लिखाण प्रसिद्ध झालेले आहे
कुमार सप्तर्षी यांनी नोव्हंबर 1967 मध्ये युवक क्रांती द्लाची ( युक्रांद ) ची स्थापना केली .तेव्हा महाराष्ट्रातील अनेक तरुण – तरुणी या चळवळीत सहभागी झाल्या. मंगल आणि शांताराम या जोडीचा यात समावेश होता. रत्नागिरीतील लांज्याजवळ केळवलीमध्ये शांताराम पंदेरे यांचा जन्म झालाा. आणीबाणीच्या काळात मराठवाड्यात युक्रांदचे पूर्णवेळ काम करताना शांतारामची मैत्री अहमदनगर जिल्ह्यातील राशीनला जैन-मारवाडी कुटुंबात वाढलेल्या कार्यकर्तीशी, मंगल खिंवसराशी झाली. मंगलच्या घरुन विरोध होत असताना दोघांनी धाडसाने विवाह केला. साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी हा विवाह घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. खरे तर या दोघांचाही मराठवाडा विभागाशी थेट संबंध नव्हता , मात्र युक्रांदच्या चळवळी निमित्ताने मंगल – शांताराम औरंगाबाद शहरात ( आताचे छ. संभाजीनगर) आले आणि युक्रांदच्या नूतन कॉलनी परिसरातील समतानगर येथे युक्रांदच्या कार्यालयात राहृू लागले.
मराठवाड्यात 1974 पासून मराठवाडा विकास आंदोलनाच्या निमित्ताने तसेच 1975 मध्ये देशावर आणीबाणी लादण्यात आल्याने , त्यविरोधात संतप्त तरुण पिढीचा एल्गार सुरु होता. जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी देश भारलेला होता. या कालखंडात युक्रांदची चळवळ जोमात होती. युक्रांदचे कार्यालय म्हणजे मराठवाड्यातील परिवर्तनवादी चळवळीचे उर्जा केंद्र बनले होते. तेव्हापाशून जीवनात अनेक संघर्षाचे प्रसंग आले, तसेच अनेक चढ – उतार आले. मात्र मंगल – शांताराम यांनी एकमेकांना खंबीर साथ दिली. दोघांचीही महाराष्ट्रात स्वतंत्र ओळख आहे.
कधी – कधी शांताराम घरी असायचा तेव्हा स्वयंपाकघरात मंगल सोबत सारी कामे करीत असायचा . खरे सहजीवन कसे असायला हवे ते आम्हाला त्यातून दिसले. मंगल शहरात सर्वच सामाजिक चळवळीत असायची. विशेषतः महिलांवर अन्याय झालेला दिसल्यावर त्यात मुलीला अथवा महिलेला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करायची. या कार्यात अनेकदा गुंडांशी सामना होत असे. मात्र मंगल न डगमगता गुंडांना पुरुन उरायची.
काही वेळा मंगल – शांताराम यांच्यावर नक्षलवादी असल्याचे आरोप झाले, शांतारामला चळवळीच्या कामामुळे अनेकदा तुरुंगवास घडला. शांताराम पायाला भिंगरी लावून सतत चळवळीच्या कामासाठी महाराष्ट्रभर फिरत असायचा . मागील काही वर्षात शांतारामला पॅरालिसिसमुळे मोठा त्रास भोगावा लागला. मात्र सतत आठ वर्षे मंगलने शांतारामची योग्य काळजी घेतल्याने शांताराम पुन्हा चालू- फिरु लागला . मंगल – शांताराम यांनी त्यांची कन्या धरती हिला चांगले शिक्षण दिले. तिच्या इच्छेनुसार तिच्या पश्चिम बंगालमधील देबाशिष या मित्राशी तिचे लग्न लावून दिले. कितीही अडचणी आल्यातरी सामाजिक कार्याचा वसा या दोघांनी सोडला नाही.
काँ. भास्करराव जाधव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिला जाणारा राज्यव्यापी अभिवादन पुरस्कार मंगल आणि शांताराम या दाम्पत्यास देण्यात आल्याने , त्या दोघांच्या सामाजिक कार्याचा उचित गौरव झाला आहे. आजच्या तरुण पिढीसाठी त्यांचे जीवन आदर्शवत आहे.