वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अंतराळयात्री सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुव विल्मोर हे बोईंग स्टारलायनर अंतराळ यानातून प्रवासासाठी निघाले. मात्र त्यांच्या यानात बिघाड झाल्याने ते अडकून पडले आहेत. हे दोन अंतराळ यात्री कधी परत येतील ते निश्चित सांगता येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अंतराळयात्री सुनिता विल्यम्स आणि बुव विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंग अंतराळ यानातून अंतराळ मोहिमेला निघाले आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. एक आठवडा किंवा त्यापेक्षा थोडा अधिक काळ अंतराळात राहून ते परतणार होते. मात्र त्यांचे यान बिघडल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच थाबावे लागले आहे. आता चार आठवडे झाले आहेत , सुनिता विल्यम्स आणि बुव विल्मोर नक्की कधी परततील ते ठरवता येत नाही. नासा आणि बोईंग यानाच्या दुरुस्तीचा प्रयत्न करीत आहेत. परतीच्या तीन संभाव्य तारखा आतापर्यंत रद्द झाल्या आहेत. सुनिता विल्यम्स आणि बुव विल्मोर नक्की परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
हीलियम गळतीमुळे बिघाड
सुनिता विल्यम्स आणि बुव विल्मोर यांच्या अंतराळ यानातील बिघाडास हीलियम गळती आणि थ्रस्टर आउटेजच्या कारणीभूत आहे. नासाच्या व्यावसायिक चालक उपक्रमाचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच यांनी पत्रकार परिषदेत बोईंग स्टारलाइनरच्या क्रू मॉड्युल बॅटरीची स्थिती आणि कामगिरीबद्दल माहिती दिली. या मोहीोचा कालावधी 45 दिवसांऐवजी आम्ही 90 दिवसांपर्यंत वाढ॓वू शकतो असेही स्टीव्ह स्टिच यांनी पत्रकारांना सांगितले.
सुरक्षितता सिध्द करावी लागणार
बोइंग स्टारलाइनर मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी चाचणी उड्डाण करणे आहे. अंतराळयानाचे कार्यप्रदर्शन, सुरक्षितता आणि विश्वासार्हता सत्यापित करणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. नासा आणि बोईंगची ही मोहिम यशस्वी झाल्यास कायम मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाव्दारे स्टारलाइनरला प्रमाणित करण्याचा मानस आहे. स्टारलाइनर अंतराळवीरांना सुरक्षितपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत पोहोचवू शकेल, ज्यामुळे अवकाश संशोधन क्षेत्रातील अमेरिकेची क्षमता वाढणार असे अपेक्षित होते. मात्र सुनिता विल्यम्स आणि बुव विल्मोर यांना आलेल्या अडचणीमुळे नासा आणि स्टारलयनरला आणखी चाचण्या कराव्या लागणार आणि मोहिमेची सुरक्षितता सिध्द करावी लागणार आहे.
अनपेक्षित संकट
सुनिता विल्यम्स आणि बुव विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असताना दुस-या एका अनपेक्षित संकटाला सामोरे जावे लागले. मुदत संपलेल्या एक रशियन उपग्रह अनपेक्षितपणे तुटला आणि त्याचे अवशेष आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आदळतील अशी शक्यता होती. सावधगिरी म्हणून, विल्मोर आणि विल्यम्स यांनी काही काळ स्टारलाइनरमध्ये आश्रय घेतला. मात्र तो अवशेष लांबून गेल्याने संकट टळले. अंतराळवीर सुमारे एक तासानंतर अंतराळ स्थानकावर परत येऊ शकले.
विल्यम्स यांचे भारताशी नाते
सुनिता विल्यम्स यांचे वडील दीपक पंड्या भारताच्या पंजाब राज्यातील मेहसाना जिल्हयातील झुलसाना येथील आहेत. यांची आई, उर्सुलिन बोनी पांड्या स्लोव्हेन-अमेरिकन होती. तीन मुलांमध्ये सुनिता सर्वात लहान होत्या. त्यांचा भाऊ जय थॉमस चार वर्षांनी मोठा आहे आणि बहीण दीना अन्नाद तीन वर्षांनी मोठी आहे. सुनीता विल्यम्स यांचा जन्म अमेरिकेत 19 सप्टेंबर 1965 रोजी युक्लिड, ओहायो, येथे झाला. 1983 मध्ये विल्यम्स यांनी ॲनापोलिस, मेरीलँड येथील यूएस नेव्हल अकादमीमध्ये प्रवेश केला. विल्यम्सचे लग्न टेक्सासमधील फेडरल मार्शल मायकेल जे. विल्यम्स यांच्याशी झाले आहे. जुलै 1989 मध्ये त्यांनी लढाऊ हेलिकॉप्टर प्रशिक्षण सुरू केले. पर्शियन गल्फ वॉरची तयारी आणि इराकमधील कुर्दीश भागांवर नो-फ्लाय झोनची स्थापना, तसेच मियामीमध्ये 1992 मध्ये चक्रीवादळ अँड्र्यू दरम्यान मदत मोहिमांमध्ये त्यांंनी हेलिकॉप्टर सहायता पथकात उड्डाण केले.
सुनिता विल्यम्स यांचा विश्वविक्रम
सुनिता विल्यम्स यांनी वयाच्या 28 व्या वर्षी 9 डिसेंबर 2006 ते 22 झून 2007 या कालावधीमध्ये पहिली अंतराळ मोहिम पार पाडली. त्यानंतर 14 जुलै ते 18 नोव्हेंबर 2012 दरम्यान त्यांनी दुसरी अंतराळ मोहीम यशस्वी केली. एक महिला म्हणून सर्वाधिक सातवेळा स्पेसवॉक आणि 50 तास 40 मिनिटांचा स्पेसवॉक टाइम हा विक्रम सुनिता विल्यम्स यांनी ााधीच आपल्या नावावर नोंदविला आहे. आता 58 वर्षीय सुनिता विल्यम्स तिस-या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेत आहेत. ही मोहीम अधिक महत्वाची आहे, कारण ही यशस्वी झाल्यास अंतराळात प्रवासी नेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.