मिडगट व्हॉल्वुलस हा विकार वाराणसीतील संकल्प नावाच्या मुलाला झाला,कमजोर स्नायू, फुगलेले ओटीपोट आणि अतिसार याने तो त्रस्त झालेला होता.
पुणे : मिडगट व्हॉल्वुलस (Midgut volvulus) हा अतिशय गंभीर विकार नवजात बालके आणि मुलांमध्ये सर्रास आढळून येतो. जन्मल्यानंतर पहिल्या काही आठवड्यातच, आतड्यांमधील जन्मजात विसंगतीमुळे ही स्थिती निर्माण होते. यामध्ये आतडे अचानक वळते. वरच्या ओटीपोटात ताण निर्माण होणे, पित्ताच्या उलट्या होणे आणि ओटीपोट नाजूक होणे ही याची प्राथमिक लक्षणे आहेत. हा विकार उपचार करून बरा करता येतो पण त्याचे निदान करण्यास उशीर झाला तर रुग्णाची तब्येत वेगाने खालावत जाते आणि जीवावर देखील बेतण्याची शक्यता असते.
हाच विकार वाराणसीतील संकल्प नावाच्या मुलाला झाला,कमजोर स्नायू, फुगलेले ओटीपोट आणि अतिसार याने तो त्रस्त झालेला होता. अवघ्या चार वर्षांच्या संकल्पला पुण्यातील प्रायव्हेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा त्याची तब्येत खूपच खालावलेली होती. पुण्यामध्ये प्रायव्हेट रुग्णालयात आणण्यापूर्वी संकल्पला वाराणसीतील एका टर्शरी केयर हॉस्पिटलमध्ये नेले होते, त्याठिकाणी त्याच्यावर सर्जरी केली गेली. पण त्यानंतर त्याच्या तब्येतीमध्ये अनेक आव्हाने उभी राहत गेली, त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या गेल्या पण त्या अयशस्वी ठरल्या. अनेक प्रयत्न करून संकल्पची तब्येत सतत खालावत गेली. त्याच्यावर पुढे काहीही उपचार करणे व्यर्थ ठरेल असे त्याच्या कुटुंबियांना सांगितले गेले होते.
तब्बल तीन महिने अशा भयानक अवस्थेत काढल्यानंतर संकल्पला पुण्यातील प्रायव्हेट रुग्णालयात हलवण्यात आले. त्याची तब्येत स्थिर करण्यासाठी ज्या तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक होते त्या केल्या गेल्या. डॉ. सचिन शहा यांच्या नेतृत्वाखाली पेडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट टीमने संकल्पला बारकाईने तपासले आणि त्याच्या वैद्यकीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे ठरवले. त्यानंतरच्या जवळपास चार तासांच्या शस्त्रक्रियेमध्ये सर्जिकल टीमला संकल्पच्या ओटीपोटात चिकटपणा आढळून आला, ज्यामुळे त्याचे आतडे एकत्र चिकटले होते आणि आतड्याच्या कामात गंभीर अडथळा निर्माण झाला होता.
पुण्याच्या सूर्या मदर अँड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ सचिन शाह ,मिडगट व्हॉल्वुलसचे निदान उशिरा करण्यात आल्याने निर्माण होणारी आव्हाने आणि या विकारामुळे मुले मृत्युमुखी पडण्याचा दर जास्त असल्याचं सांगितलं. या समस्या असून देखील पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केयर युनिट (पीआयसीयू) टीम आणि पेडियाट्रिक सर्जन्स यांना सहभागी करवून घेण्याचा मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन खूप महत्त्वाचा ठरला. सर्जिकल टीमला तज्ञ ऍनेस्थेटिस्टसची साथ मिळाली, त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आतडी वेगवेगळी केली, झालेले नुकसान दुरुस्त केले आणि विस्तृत सर्जरी करून आतड्याचे काम पूर्ववत सुरु होईल अशी व्यवस्था केली.
संपूर्ण टीमने एकमेकांना आवश्यक तो सहयोग करत काम पूर्ण केल्याने सर्जरीनंतर 48 तासांमध्ये संकल्पच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. अखेरीस सहा दिवसांनंतर संकल्प खऱ्या अर्थाने जेवू शकला. संकल्पची तब्येत बरी होण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांमध्ये हा एक खूप महत्त्वाचा टप्पा ठरला.सर्जरीनंतर संकल्पच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली आणि 10 दिवसांनंतर त्याला घरी पाठवण्यात आले. पुढील तीन महिने त्याच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवले गेले. तीन महिन्यांच्या फॉलो-अप कालावधीनंतर त्याचे वजन योग्य पद्धतीने वाढू लागल्यावर डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले.