कोल्हापूर-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे समग्र कार्य हे एकमेवाद्वितिय आणि प्रेरक असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने डॉ. मच्छिंद्र गोफणे आणि डॉ. नीलेश शेळके लिखित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर: जीवन आणि कार्य’ आणि दत्तात्रय भैरवनाथ घुटूगडे संपादित ‘कोल्हापूर पुराभिलेखागारातील राजर्षी छत्रपती शाहू दप्तरातील होळकर रियासतीसंबंधी कागदपत्रांची सूची’ अशा दोन ग्रंथांचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्ताने विद्यापीठात विविध विचारवंत मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. पण ती व्याख्याने केवळ कार्यक्रम पत्रिकेपुरती न राहता त्या कार्यक्रमाच्या पाऊलखुणांचे जतन करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न म्हणजे डॉ. गोफणे आणि डॉ. शेळके यांचा ग्रंथ होय. नेटक्या संपादनामुळे हा ग्रंथ सुबक आणि वाचनीय झाला आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रय घुटूगडे यांच्या कागदपत्र सूचीच्या संकलनामुळे करवीर संस्थान आणि इंदूर संस्थान यांच्या दरम्यान असणारे सहसंबंध सामोरे आले आहेत. विशेषतः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी होळकर संस्थानाशी केलेला पत्रव्यवहार या द्वारे सामोरा आला आहे. संशोधकांना यामुळे एक वेगळे दालन या ग्रंथाने खुले करून दिले आहे. त्यामुळे सर्वच लेखक, संपादक अभिनंदनास पात्र असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, विद्यापीठाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाने अवघ्या दीड वर्षांत केलेले हे ग्रंथनिर्मितीचे कार्य मौलिक आहे. याद्वारे मराठेशाहीच्या अलक्षित इतिहासाचे जागरण झाले आहे, ही महत्त्वाची बाब आहे.कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक अध्यानाचे समन्वयक डॉ. मच्छिंद्र गोफणे यांनी केले. दत्तात्रय घुटूगडे यांनी आभार मानले.
यावेळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत कुलगुरू डॉ. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, डॉ. नीलेश शेळके, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अवनीश पाटील, डॉ. जी. बी. कोळेकर, अविनाश भाले, डॉ. जयवंत भोसले, डॉ. किशोर खिलारे, यश आंबोळे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.