कोल्हापूर :आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन शिक्षणाने क्रांती घडवली आहे. असे प्रतिपादन श्री. मिलिंद पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि शिक्षणशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम. उषा अंतर्गत ई-कन्टेन्ट परस्परसंवादी या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख प्रा.डॉ.चेतना सोनकांबळे होत्या.
यावेळी उपकुलसचिव व्ही.बी.शिंदे, डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. विदयानंद खंडागळे, डॉ.सुप्रिया पाटील आणि विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, की याच प्रवाहात आता प्रादेशिक भाषांमध्येही विविध कोर्सेस उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे.गेल्या काही वर्षांत इंग्रजी भाषेतील ऑनलाईन शिक्षण व्यासपीठे प्रचंड लोकप्रिय झाली. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजीतील अडचणींमुळे शिकणे कठीण जात होते. हीच अडचण लक्षात घेऊन आता, यू जी सी -सी ई सी.स्वयंम आणि स्वयंप्रभा या प्लॅटफॉर्मवर मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये कोर्सेस उपलब्ध करून देणार आहेत.त्यामुळे प्रादेशिक भाषेत शिक्षणाचा फायदा होणार आहे. सोप्या भाषेत समजावटीचा फायदा होतो मातृभाषेत शिकल्याने विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो. ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळेल.व्यावसायिक कौशल्य विकास साधला जाणार आहे. डिजिटल मार्केटिंग, प्रोग्रामिंग, व्यवसाय व्यवस्थापन यांसारखे कोर्सेस आता प्रादेशिक भाषांमध्येही शिकता येणार आहे.प्रादेशिक भाषेत ऑनलाईन कोर्सेसची उपलब्धता वाढते आहे.त्यामुळे शिकणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी भविष्यात असल्याचे श्री. पाटील म्हणाले. अध्यक्ष प्रा.डॉ.चेतना सोनकांबळे म्हणाल्या की, ई-कन्टेन्ट विकसित करताना तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात ई- कन्टेन्टला भविष्यात महत्व येणार आहे. तसेच यातून रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.यावेळी स्वागत व प्रास्ताविक प्र.संचालक प्रा.डॉ.के. बी.पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख शुभम गायकवाड यांनी केली. सूत्रसंचालन सहा.प्रा.डॉ. नितीन रणदिवे यांनी केले. तर आभार रुचिता थरोली यांनी मानले.