शास्त्रीय संगीत आणि मराठी खादयपदार्थांची भुरळ
ज्येष्ठ पत्रकार आणि अर्थतज्ञ यमाजी मालकर सध्या युरोपीय देशांच्या दौ-यावर आहेत. जर्मनीमध्ये तीस देशांनी एाकत्रित साज-या केलेल्या वसंतोत्सवाची माहिती त्यांनी फेसबुक भिंतीवर दिली आहे. ती माहिती त्यांच्याच शब्दात फेसबुकवरुन साभार.
जर्मनीतील शहरे आणि गावांत बाहेर लोक दिसत नाही, हे मत आठ दिवसातच बदलण्याची वेळ माझ्यावर आली. इथला वसंत सुरू झाल्याने लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे या दिवसात सर्वत्र दिसते आहे. मला पाहता आले, ते दोन तीन प्रसंग तर वेगळाच अनुभव देऊन गेले. मे आणि जून हा काही इथे पाऊसाचा किंवा थंडीचा काळ नव्हे, पण यावेळी तो लांबल्याची चर्चा येथे ऐकू येते आहे. वसंतात येथे अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम होताना दिसत आहेत आणि तेथे लोकांची आपल्यासारखीच गर्दी पाहायला मिळते आहे.
ब्रावो मराठी मंडळ
उत्तर जर्मनीतील एक मोठे शहर हॅनोवर जवळ ब्राऊनश्वेग आणि वुल्फबर्ग ही दोन छोटी शहरे आहेत. तेथे फॉक्स वॅगन गाड्यांचा मोठा उद्योग असून त्यामुळे हा भाग संपन्न मानला जातो. अनेक भारतीय इंजिनिअर त्या भागात काम करतात, त्यात मराठी मंडळी अधिक आहेत. मायभूमीपासून इतक्या दूर आलेल्या मराठी बांधवांना एकत्र करण्याचे काम विडेल या टुमदार गावात राहणाऱ्या अमोल भागवत आणि त्यांच्या मित्रांनी केले आहे. त्यांनी ब्रावो मराठी मंडळाची 2020 मध्ये स्थापना केली. मराठी वारसा जपण्यासाठीचे प्रयत्न आणि मराठी तरुणांसाठी नेटवर्किंग मंडळ करते. पुण्यातील अमोल आणि प्राजक्ता या दाम्पत्याचे घर हेच या मंडळाचे कार्यालय. सांस्कृतिक समृद्ध असलेल्या ब्राऊनश्वेगमध्ये याच दरम्यान शहरातर्फे दरवर्षी इंटरनॅशनल फेस्टिव्हल होतो. तो एक जून रोजी होता. तीस देशांच्या नागरिकांनी त्यात भाग घेऊन आपल्या कला सादर केल्या. मराठी मंडळ आता त्याचे एक पार्टनर झाले असून त्याचा डंका त्यादिवशी आम्हाला पाहायला मिळाला.
अंजली मालकर यांचे शास्रीय गायन
मंडळाने माझी पत्नी अंजलीला शास्त्रीय गायनासाठी निमंत्रित केले होते, म्हणून हा महोत्सव आम्हाला पाहाता आला. महोत्सवाची सुरवात ढोलताशा लेझीमने, मधल्या भागात अंजलीचे 40 मिनिटांचे गायन, पुढे बॉलीवूडची नृत्ये आणि महोत्सवाचा शेवट गरबा नृत्याने असा भारतीयांचा दिवसभराच्या कार्यक्रमांत बोलबाला होता. केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे तर ब्रावो मराठी मंडळाने लावलेल्या खाद्यपदार्थ्याच्या दालनावर दिवसभर रांगा लागल्या होत्या. त्या शहराच्या सुंदर सिटी सेंटरमध्ये जणू गर्दीचा विक्रम झाला. एरवी जर्मन लोकांना निसर्ग घराबाहेर पडू देत नाही, त्यामुळे संधी मिळताच तो किती मौज करून घेतो, हे तेथे पाहायला मिळाले. अमोल भागवतांच्या संपर्कामुळे अनेक मराठी कुटुंबांशी ओळख झाली.
प्रेमाच्या आणाभाका
त्यानंतर दोनच दिवसात कलोन आणि ड्युसोलडोल्फ या शहरात जाण्याची संधी मिळाली. माझे मित्र संतोष देशपांडे तेथे आले होते. कलोन हे 2000 वर्षे जुने शहर. तेथील दोन मनोऱ्यांचे जुने चर्च प्रसिद्ध आहे, त्याची महायुद्धात खूप हानी झाली होती, त्याचा जीर्णोद्धार अजून चालू आहे, असे म्हणतात. राईन नदीचा किनारा या शहराला मिळाला असून तिच्यावर एक दणकट पूल आहे. त्या पुलाला प्रेमाच्या आणाभाका घेणारी जोडपी कुलूप लावून किल्ली नदीत फेकून देतात. त्यांच्या प्रेमाला जगाची दृष्ट लागू नये म्हणून! त्या अर्ध्या किलोमीटर पुलावर किमान एक दीड लाख कुलूपे लटकलेली आहेत आणि युरोपमधील अनेक पूल हे प्रेमाचे ओझे वर्षानुवर्षे वाहताना दिसतात. आशावादासाठी माणूस असा श्रद्धेचा आधार जगभर घेतो. त्यामुळे अशा भारतीय श्रद्धांकडे याच दृष्टीने पाहिले पाहिजे, असे वाटते. अर्थात, त्यातील टोकाची अंधश्रद्धा वाईटच. संतोष आणि मी ड्युसोलडोर्फला छपाई विषयक प्रसिद्ध द्रुपा प्रदर्शन पाहणार होतो, पण 80 युरो प्रवेश फीने आम्हाला रोखले. अर्थात, ते प्रदर्शन दोघानी पूर्वी पाहिलेले असल्याने रुखरुख वाटली नाही. शिवाय, त्या दिवशी भारतात निवडणूक निकाल लागत होते, त्यामुळे कलोनमध्येच आम्ही कॉफी पे चर्चा केली. ते फेसबुक लाईव्ह संतोष यांनी टाकलेच आहे. आपल्या देशातील दोन्ही बाजूच्या ‘विचारवंत अतिरेक्यांनी’ व्यक्त होताना जो तोल सोडला आहे, त्यामुळे असे व्यक्त होणे अवघड झाले आहे. पण त्याचा विचार न करता आम्ही ही चर्चा करू शकलो.
जर्मनीची आर्थिक राजधानी मानली जाते त्या फ्रँकफर्टमध्ये पाच जूनला जेपी मॉर्गन मॅरेथॉन होती, ती जवळून पाहता आली. झाडून साऱ्या कंपन्यांनी तीत भाग घेतलेला असल्याने लाखभर लोक एका ठिकाणी पाहायला मिळाले. तिला यंदा 30 वर्षे पूर्ण झाल्याने उत्साह अधिक असावा. त्यांच्या नियोजनाला आणि शिस्तीला दाद दिलीच पाहिजे. आणि, हो ते एकत्र आले की आपल्या सारखेच मोठमोठ्याने बोलतात, हे पाहून आपणच मोठ्याने बोलतो, या आरोपातून मी माझी सुटका करून घेतली!