Thursday, October 3, 2024
Homeबातम्याप्रस्थापित विचाराला तर्कनिष्ठ विरोध हे शाहू पाटोळेंच्या लेखनाचे सामर्थ्य - प्रा ....

प्रस्थापित विचाराला तर्कनिष्ठ विरोध हे शाहू पाटोळेंच्या लेखनाचे सामर्थ्य – प्रा . जाधव

शाहू पाटोळे यांच्या ‘कडूसं’ पुस्तकाचे धाराशीव येथे प्रकाशन

धाराशीव – प्रस्थापित विचाराला अभ्यासपूर्वक आणि तर्कनिष्ठ विचारांनी खोडणे हे शाहू पाटोळे यांच्या लेखनाचे सामर्थ्य आहे, त्यामुळे ‘कडूसं’ मधील प्रत्येक लेख वैचारिक जाण वाढविणारा आहे असे मत प्रा . ए.डी . जाधव यांनी व्यक्त केले . 

लेखक शाहू पाटोळे यांच्या ‘कडूसं’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते . पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्वशास्त्र विभागाच्या माजी विभाप्रमुख डॉ . माया पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले . यावेळी मंचावर डॉ . रवींद्र चिंचोलकर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील तसेच लेखक शाहू पाटोळे यांची उपस्थिती होती.धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

याप्रसंगी पुढे बोलताना प्रा . ए .डी . जाधव म्हणाले की शाहू पाटोळे, माया पाटील यांच्यासारखे विद्यार्थी रा .प . महाविद्यालयांमध्ये आमच्या समोर होते . या विद्यार्थ्यांचा अभ्यास इतका असे की त्यांना शिकवण्यासाठी आम्हाला देखील अधिक तयारी करून यावे लागत असे . या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात आता मोठा नावलौकिक कमावला आहे . त्यांचे शिक्षक म्हणून लोक आता आम्हाला ओळखतात  याचा मला विशेष अभिमान वाटतो .

याप्रसंगी बोलताना डॉ . माया पाटील म्हणाल्या  शाहू पाटोळे यांचे विचार सुरुवातीच्या काळामध्ये मनाला पटत नव्हते .मात्र त्यामागचा त्यांचा अभ्यास आणि तर्क हे लक्षात घेतल्यानंतर ते विचार आवडू लागले .महाविद्यालयात आमच्या एक वर्ष पुढे शिकणारे शाहू पाटोळे हे तेव्हापासून  साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत होते . त्या काळात माझे व इतरांचे लेखन  त्यांनी वृत्तपत्रामध्ये  छापून, त्यांनी आम्हाला लेखनाची प्रेरणा देण्याचे कार्य केले .

डॉ . रवींद्र चिंचोलकर म्हणाले कोणाचीही पर्वा  न बाळगता लेखन करणे हे शाहू पाटोळे यांचे वैशिष्ट्य आहे . अनेक लेखक  लोक काय म्हणतील असे म्हणून  जिथे लिहायचे थांबतात तिथून शाहू पाटोळे यांच्या लेखनाला सुरुवात होते . समाजातील विसंगती दाखवून त्यावर परखड भाष्य करण्याचे  काम शाहू पाटोळे करतात . टीका करताना आपला – परका असा कुठलाही भेदभाव न करता जो चुकेल त्याला फटकारण्याचे कार्य ते करतात .

माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील म्हणाले की शाहू पाटोळे यांना आम्ही विद्यार्थी दशेपासून पाहिले आहे . त्यांनी मोठ्या कष्टाने वेगवेगळ्या ठिकाणी कष्टाची कामे करत शिक्षण घेतले . आता शाहू पाटोळे यांनी मोठा नावलौकिक मिळविला आहे . त्यांच्या लेखनामुळे धाराशिव जिल्ह्याचा नावलौकिक जागतिक स्तरावर पोहोचला आहे .

लेखक शाहू पाटोळे याप्रसंगी बोलताना म्हणाले की मी 1982 पासून वृत्तपत्रात लिहायला लागलो .तेव्हापासून वेळोवेळी मी विविध वृत्तपत्रात आणि नियतकालिकाचे लेख लिहिले .त्यात मांडलेली भूमिका आणि माझी आजची भूमिका यात काहीही बदल नाही .  या लेखांचा संग्रह प्रकाशित करावा असे वाटले ,ते लेख ‘ कडूसं ‘ मध्ये एकत्र करण्यात आलेले आहे .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दौलत निपाणीकर यांनी केले.   स्वागत पुस्तकाचे प्रकाशक मीरा प्रकाशनचे जीवन कुलकर्णी यांनी केले .

मराठवाडा साहित्य परिषद धाराशिव शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .मसापच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष  नितीन तावडे, सचिव माधव इंगळे, कोषाध्यक्ष बालाजी तांबे इत्यादींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले .

 .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments