Monday, October 7, 2024
Homeबातम्याबार्टीच्या 763 संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृती मंजूर

बार्टीच्या 763 संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृती मंजूर

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळल्याने संशोधक विद्यार्थी आनंदले

मुंबई – डॉ .बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत अनुसूचित जातीच्या 763 विद्यार्थ्यांना पीएच .डी . साठी संपूर्ण शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या 25 ऑगस्ट 2024 च्या बैठकीत घेण्यात आला . 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संशोधक विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडविला त्याबद्दल संशोधक विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .

बार्टीच्या  संशोधन शिष्यवृत्तीसाठी  2021 पासून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून शिष्यवृत्ती मंजूर केली जात नव्हती .  महाज्योती आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली . मात्र बार्टीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नव्हती . विद्यार्थांनी मागील दोन वर्षांपासून विविध प्रकारे आंदोलन करीत शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली . शिष्यवृतीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण केले, लाँग मार्च काढला, मुंडन केले . अगदी टोकाला जाऊन आत्मदहनाच्या प्रयत्नापर्यंत आंदोलने करून झाली . 

विद्यार्थ्यांनी बार्टी मार्फत पीएच.डी. करणाऱ्यांना शिष्यवृती मिळावी म्हणून केलेल्या  एवढ्या प्रखर आंदोलनानंतरही सरकारने शिष्यवृत्तीसाठी समान धोरण आखण्याच्या  नावाखाली बार्टी, महाज्योती, सारथी मार्फत   मोजक्याच  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा आदेश काढला . महाराष्ट्र सरकारने 25 जुलै 2024 रोजी काढलेल्या या आदेशात  बार्टी, महाज्योती तसेच सारथी या संस्थांमार्फत  प्रत्येकी केवळ 300 विद्यार्थ्यांनाच संशोधन शिष्यवृत्ती मिळू शकते असे मृट म्हटले होते . या शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांना निम्मीच शिष्यवृत्ती दिली जाईल असे नमूद केले होते .यावर बार्टीच्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले होते की सदर परिपत्रक निघण्यापूर्वी या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत .त्यामुळे या विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती मिळावी .यासाठी बार्टीच्या पुणे येथील कार्यालयासमोर विद्यार्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते 

  शिष्यवृतीची पूर्ण रक्कम देण्याचा निर्णय झाल्याशिवाय आणि नोंदणी दिनांकापासून शिष्यवृती देण्याचा  निर्णय  झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही या निर्णयावर संशोधक विद्यार्थी ठाम होते .

  5 ऑगस्ट 2024 पासून विद्यार्थ्यांनी पुणे येथे बार्टी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले . गंगाधर दुगाणे  या  विद्यार्थ्याने तर स्वत:वर पेट्रोल ओतून घेत बार्टी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा  प्रयत्न केला . अखेरीस 16 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून आपण हा प्रश्न येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडू आणि सोडवू असे आश्वासन दिले होते .दिलेल्या शब्दानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना समवेत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली . त्यानंतर दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय त्यांनी मंजुरीसाठी मांडला . या विषयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली .या निर्णयानुसार बार्टीच्या 763 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि तीही शिष्यवृत्तीची निम्मी नव्हे तर पूर्ण रक्कम मिळणार आहे असे स्पष्ट झाले आहे . .या संशोधन शिष्यवृत्तीसाठी मंत्रिमंडळाने 37  कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे शासनाने कळविले आहे .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शिष्यवृत्ती मंजूर केली याबद्दल संशोधक विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .

 .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments