एका स्वीस फ्रँकचे मूल्य 92 रुपये आहे, हे कळल्यावरच स्वित्झर्लंडला जावे की नाही, असा पहिला विचार आला. मात्र आधीच एका युरोसाठी आपण 90 रुपये जर्मनीत मोजतो आहोत, हे जाणवल्याने दोन दिवस का होईना, पण स्वित्झर्लंडला जाण्याचा निर्णय आम्ही घेतला.
कन्या आणि जावई जर्मनीत राहात असल्याने आणि जर्मन जावयाची फिरण्यास भाषा-मदत होणार असल्याने हे जुळून आले. युरोपातील सर्वात उंच आल्प्स पर्वताचा 60 टक्के भाग स्वित्झर्लंडने व्यापला आहे आणि जगातला तो एक सर्वाधिक श्रीमंत देश आहे, त्यामुळे त्या विषयी मनात कुतूहल होतेच. एका चौरस किलोमीटरला 210 लोकसंख्येची घनता असलेला पण एकूण 80 लाखच लोक राहात असलेला हा छोटा देश. (जगात आकारमानात 136 वा) आठ स्मव्हित्नेझ बर्फ, त्यामुळे बारमाही धबधबे, तसेच 1500 मोठे तलाव असलेला असा हा पाणीदार देश. आल्प्सला जोडून असलेल्या भागात नद्या नाले खळखळून वाहतात. भारतातील पाणी टंचाईचे आजचे चित्र आठवून त्याच्याविषयी मनात असूया निर्माण होते!
दोन मोठ्या तलावांच्या मध्ये असलेल्या प्रसिद्ध इंटरलाकेन या प्रसिद्ध पर्यटन शहराच्या अवतीभवती आम्ही फिरलो. तेथून जवळ पर्वताच्या कुशीतील खेड्यात राहिलो. दोन पर्वतरांगामध्ये आणि तळ्याच्या काठी अशी गावे दिसतात. ती शहरांशी अतिशय उत्तमरीत्या जोडलेली आहेत.
स्वित्झर्लंड श्रीमंत आहे, म्हणजे श्रीमंतीच्या सर्व निकषांमध्ये तो बसतो. उदा. तेथील सरासरी वेतन भारतीय रुपयात साडे पाच लाख रुपये आहे. ‘डिस्पोजेबल इन्कम’मध्ये लक्झमबर्ग नंतर युरोपात त्याचा दुसरा नंबर लागतो. त्यामुळेच मध्यमवर्गीय स्थानिक नागरिकांनाही तो महाग वाटतो. सर्व नागरिकांना सरकारने विशिष्ट रक्कम दरमहा द्यावी, असे आंदोलन त्यामुळेच तेथे झाले होते. पण प्रत्येक मोठा निर्णय जनमत चाचणीने घेण्याच्या पद्धतीमुळे तसे काही होऊ शकले नाही. ती मागणी फेटाळून लावण्यात आली. आम्ही झुरीच स्टेशनवर ‘राईस अप’ या थाई स्वस्त समजल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये एकदा जेवण घेतले, त्यासाठी 1700 रुपये लागले! फ्रँकचे हे जडत्व आम्हाला माहीत असल्याने घरच्या खाण्यापिण्याचे पदार्थ सोबत ठेवण्याची चलाखी आम्ही केलीच होती.
स्वित्झर्लंड एवढा श्रीमंत झालाच कसा, याचे एक उत्तर त्याने युद्धांत भाग घेतला नाही आणि सर्व जगाचे पैसे सांभाळले. (आणि अर्थात वापरलेही) हे आहे. जगातला काळा पैसा स्वीस बँकेत ठेवला जातो, पण ज्याला आपण स्वीस बँक म्हणतो, असे ‘टॅक्स हेवन’ 10 ते 15 देश जगात आहेत. श्रीमंतीची जी खरी कारणे आहेत, त्यात
त्यांनी पायाभूत सुविधांची केलेली भक्कम उभारणी, मुबलक परकीय चलन देणारे वर्षाला सव्वा कोटींवर पर्यटक, स्वीस घड्याळाचे आणि चॉकलेटचे केलेले मार्केटिंग, औषध संशोधनाचे मिळवलेले पेटंट्स, बँकिंग आणि फायनान्सवर दिलेला भर, औषधांच्या आणि यंत्रांच्या निर्यातीत घेतलेली आघाडी, शिस्तबद्ध जीवनशैली आणि त्याला साथ देणारे हवामान, या सर्वांचा समावेश होतो. जेनेरिक औषधांचा जगाला 20 टक्के पुरवठा करणाऱ्या भारताशी अधूनमधून भांडण सुरू असते ते या पेटंटस वापरावरून. फ्री ट्रेड ऍग्रीमेंटसाठी भारत आणि स्वित्झर्लंड 16 वर्षे धडपडताहेत, त्याचे कारण कदाचित हेच असावे.
जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि Rhgeto Romance अशा चार भाषा बोलणारा स्वीस समाज आतापर्यंत बाहेरच्या नागरिकांचे स्वागत करणारा राहिला आहे, त्यामुळेच आज तेथील 30 टक्के नागरिक मूळचे नाहीत. हा समाज वेळेचा फारच पक्का आहे. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या रेल्वेच्या काटेकोर वेळांत दिसते. एका रेल्वेतून उतरून दुसरी रेल्वे पकडण्यासाठी 3 ते 10 मिनिटांचे अंतरही पुरेसे होते, याचा अनुभव आम्ही चार पाच वेळा घेतला. आम्ही राहात होतो, त्या खेड्यात येणारी बस ठरलेल्या मिनिटाला प्रवासी नसले तरी निघत होती!
श्रीमंत देश म्हणून त्याला समस्याच नाही, असे मात्र होऊ शकत नाही. महागाई हा या देशाचाही प्रश्न आहे, त्यामुळे सीमेवर राहणारे नागरिक जर्मनीला जाऊन खरेदी करतात म्हणे! पर्यटक पैसा देत असले तरी त्यांचा त्रास होतो, त्याची चर्चा येथे नेहमी सुरू असते. इटलीतील व्हेनिसवासीयांनी प्रवेशासाठी तिकीट लावण्याचे पाऊल उचलले आहे, तसे येथेही काही ठिकाणी करावे, ही मागणी उचल खाते आहे. पर्यटकांना राहण्यासाठी जागा लागते म्हणून पर्यटन ठिकाणी जमिनीच्या किंमती वाढत असून या व्यावसायिक वापरामुळे स्थानिक ‘भूमिपुत्र’ बाहेर ढकलले जात आहेत.Verbeir हे ठिकाण हिवाळी खेळासाठी प्रसिद्ध आहे, तेथे म्हणे एका चौरस मीटर ला 23 हजार रुपये मोजावे लागतात म्हणे! (अर्थात, आमच्या मुंबईत मोक्याच्या ठिकाणी हा दर साडे सहा लाख रुपयांवर जाऊन आला आहे.) आर्थिक विषमता हा तर येथेही मोठाच मुद्दा आहे. तरी युद्धानंतरही स्वित्झर्लंडने महागाई 3.5 टक्क्यांवर जाऊ दिली नाही. आणि ती 22 वर्षांतील सर्वाधिक चलनवाढ होती म्हणे! फ्रँकला सोन्याच्या साठ्याचा भक्कम आधार असल्याने तो खूपच स्थिर मानला जातो, त्यामुळेच त्यांना व्यवहारात इतर चलने चालत नाहीत. प्रसिद्ध विद्यापीठांत बाहेरून येणारे विद्यार्थी आता या देशाला जड झाले, असे दिसते. कारण त्यांचे शुल्क तिप्पट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या निषेधाचे फलक आम्हाला झुरीच विद्यापीठात पाहायला मिळाले. आपल्या समस्यांसमोर या समस्या काहीच नाहीत म्हणा!
भिंतीवर टांगलेल्या चित्रासारखा हा देश आहे, यात काही अतिशयोक्ती नाही, म्हणून तर बॉलिवूडला त्याने भुरळ घातली. उष्णतेच्या लाटा, पाण्याचे दुर्भिक्ष्य, कोरड्या हवेमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य, प्रचंड लोकसंख्येमुळे दाटीवाटीने राहण्याची सक्ती आणि आर्थिक – सामाजिक विषमतेचे चटके सहन करणाऱ्या आपणा भारतीयांना पडद्यावर हे चित्र आवडले नसते तरच नवल! हाही एका खिडकीतून काही क्षण दिसणारा कवडसा.