मुंबई – महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) चर्चनी भाविकांना ‘स्व-घोषणापत्र’ (self-declaration form) भरण्यास सांगण्यास सुरुवात केली आहे.
या पत्राद्वारे, आपण कोणत्याही दबावाखाली नसून स्वतःच्या इच्छेने प्रार्थनेसाठी उपस्थित राहत असल्याचे भाविक स्पष्ट करत आहेत.
“स्वतःच्या सुरक्षिततेसाठी” गोळा केलेले हे घोषणापत्र चर्चच्या कार्यालयात ठेवले जातील, जेणेकरून सरकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास ते दाखवता येतील, अशी माहिती शेजारच्या पालघर जिल्ह्यातील वसई येथील पास्टर सॅम मथाई यांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट २०२६) पीटीआयला दिली.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून भाविकांकडून ही घोषणापत्रे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मथाई यांनी दावा केला की, गेल्या सहा महिन्यांत MMR भागात – विशेषतः मुंबईला लागून असलेल्या वसई-विरार, पालघर, नालासोपारा आणि भाईंदर या उपनगरांमध्ये – चर्चवर ११ हल्ले झाले आहेत.
“उजव्या विचारसरणीचे गट पूर्वसूचना न देता चर्चमध्ये घुसतात आणि लोकांना मारहाण करतात. त्यानंतरच पास्टर आणि समाजातील नेत्यांनी एकत्र येऊन यावर उपाय शोधण्याचे ठरवले. आम्ही कोणावरही प्रार्थनेसाठी येण्याची सक्ती करत नाही. भारतीय संविधान प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेनुसार प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य देते,” असे त्यांनी नमूद केले.
MMR मध्ये ४,००० हून अधिक चर्च आहेत. काही चर्च केवळ जन्माने ख्रिश्चन नसलेल्या भाविकांकडून ही पत्रे भरून घेत आहेत, तर काही चर्च नियमितपणे येणाऱ्या भाविकांनाही ती भरण्यास सांगत आहेत, अशी माहिती मथाई यांनी दिली.

