Wednesday, July 16, 2025
Homeअर्थकारणआपला परिसर पाणीदार बनवा; जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचे आवाहन

आपला परिसर पाणीदार बनवा; जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचे आवाहन

सोलापूर, दि. 17- आज सर्वत्र प्रदूषण वाढले आहे. प्लास्टिकचा वापर देखील वाढला आहे. त्यामुळे नदी, नाले, समुद्र प्रदूषित बनले आहेत. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी नद्यांचे आरोग्य बिघडवले आहे. वेळीच खबरदारी घेऊन नदी, नाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत आपला परिसर पाणीदार बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रख्यात जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पीएम उषा योजनेअंतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या विषयावर आयोजित एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, जल बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चूघ, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉ. विरभद्र दंडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत एनएसएसचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले.

डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, आज आधुनिक शिक्षण घेताना नवीन शैक्षणिक धोरणात देखील पर्यावरण, प्रदूषण, जलसाक्षरता या विषयावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान मिळेल. नदी, नाल्यांच्या आरोग्यावर सर्वांनी प्रेम करणे आवश्यक आहे. आज पाण्यावरच जीवन अवलंबून आहे. पाणीदार परिसर होण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण, छोटे, मोठे बंधारा तयार करणे, जमिनीत पाणी मुरवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे. पाणी असेल तर शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होतो. चांगली शेती कसता येते. त्यासाठी सर्वांनी यावर प्रेम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून हरित पर्यावरणासाठी पाच वर्षात पाच लाख वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या नवीन कॅम्पस परिसरातील दोन तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण, सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मिळत आहे. तापमान वाढत असल्याने वृक्ष संवर्धन करणे आवश्यक आहे. वेळीच खबरदारी नाही घेतल्यास भविष्यात गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे विद्यापीठाच्यावतीने जागरूकता निर्माण करण्यात येत असल्याचे कुलगुरू डॉ. महानवर यांनी सांगितले.

या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, ऍड. मल्लिनाथ शहाबादे, ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा, रजनीश जोशी, डॉ. विनोद बोधनकर, मिलिंद पगारे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार डॉ. वीरभद्र दंडे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments