कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या संख्याशास्त्रातील योगदानाच्या सन्मानार्थ विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाच्या वतीने दिनांक १९ ते २१ जून या कालावधीत ‘अॅडव्हान्सेस इन स्टॅटिस्टिकल मेथड्स, डेटा सायन्स अँड ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेत देशविदेशांतील १५०हून अधिक संख्याशास्त्रज्ञ सहभागी होणार असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या बीजभाषणाने परिषदेस प्रारंभ होईल. ही माहिती संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी दिली आहे.डॉ. दिगंबर शिर्के १९९० साली संख्याशास्त्र अधिविभागात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. गेल्या तीन दशकांमध्ये त्यांनी अधिविभागातील अध्यापनाबरोबरच संख्याशास्त्रातील मूलभूत संशोधनामध्ये जागतिक कामगिरी नोंदविली आहे.
आघाडीच्या वित्तीय संस्थांनी प्रायोजित केलेले नऊ संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी शैक्षणिक, औद्योगिक आणि प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत.डॉ. शिर्के हे भारताच्या आघाडीच्या संख्याशास्त्रज्ञांमध्ये गणले जातात. ते ‘इंडियन सोसायटी फॉर प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स’चे फेलो आहेत. संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख म्हणून नऊ वर्षे जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना संख्याशास्त्राधिष्ठित उद्योगांत संधी मिळाव्यात, या हेतूने एम.एससी. (अप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेटिक्स) हा अभ्यासक्रम सुरू केला. विभागातील संगणक प्रयोगशाळेचे आधुनिकीकरण घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
संख्याशास्त्रातील नवे प्रवाह अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावेत, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवण्यात आल्या. शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये त्यांनी संख्याशास्त्र विषयावर लोकप्रिय व्याख्याने दिली. त्याचप्रमाणे, अमेरिका, पोर्तुगाल, जर्मनी, सिंगापूर, स्वित्झर्लंड, मलेशिया, थायलंड, नेदरलँड्स या देशांतील विद्यापीठांना भेटी देऊन संशोधनपर व्याख्याने दिली. आपले शैक्षणिक व संशोधनात्मक काम करत असतानाच त्यांनी कोल्हापूर परिसरातील विविध उद्योगांसाठी संख्याशास्त्रीय सल्लागार म्हणूनही काम केले. तसेच, त्यांच्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले.
कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी विद्यापीठात विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. विद्यार्थी वसतिगृहाच्या अधीक्षक पदापासून ते कुलसचिव, रुसा समन्वयक आणि पुढे प्र-कुलगुरू व कुलगुरू ही पदे भूषविली. अधिसभा, विद्यापरिषद, व्यवस्थापन परिषद अशा विविध अधिकार मंडळांवर त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली.डॉ. शिर्के यांच्या संख्याशास्त्रातील या योगदानाचा गौरव करण्याच्या हेतूने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ वैद्यकीय संशोधक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग हे परिषदेचे बीजभाषण करणार आहेत. परिषदेसाठी अमेरिका, मलेशिया, आणि ग्रीस येथील नामवंत संख्याशास्त्रज्ञांना निमंत्रित वक्ते म्हणून पाचारण करण्यात आले आहे. देशातील विविध विद्यापीठांमधूनही १५० हून अधिक संख्याशास्त्रज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत. ३० ज्येष्ठ भारतीय संख्याशास्त्रज्ञ, भारतीय सांख्यिकी सेवेतील पाच अधिकारी, रिझर्व बँक ऑफ इंडिया मधील दोन अधिकारीही सहभागी होणार आहेत.ही परिषद मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन (भारत सरकार), रिझर्व बँक ऑफ इंडिया, नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्स, आणि अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन यांच्या वित्तीय सहाय्याद्वारे आयोजित करण्यात आली आहे.