Thursday, October 3, 2024
Homeकलारंजनदिल ही दुखाने के लिए आ...

दिल ही दुखाने के लिए आ…

‘रंजिश ही सही’ ही गझल ऐकली नाही असं होऊच शकत नाही.ही केवळ गझल नसून एक कलाकृती आहे. आयुष्यात एखादीच अशी भव्य, अद्वितीय गोष्ट करावी आणि आयुष्य संतुष्ट व्हावं तसं या गझलेनं फ़राज़ साहेब आणि हसन साहेबांना दान दिलं आहे. यावर पत्रकार वसुंधरा काशीकर यांनी लिहिलेला हृदयस्पर्शी लेख .

भय इथले संपत नाही….कवी ग्रेस यांच्या कवितेच्या ओळींबद्दल एकदा पं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी फारच अंतर्दृष्टी असलेली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, ‘‘माणूस हा इतक्या नाना त-हेच्या भयाने ग्रस्त असतो. जीवनातली ही वास्तविकता ग्रेस यांनी इतकी अचूक पकडली आहे की भय इथले संपत नाही या ओळींनंतर ग्रेस यांनी काहीही लिहिलं नसलं तरी चाललं असतं’’….अगदी त्याच धर्तीवर म्हणावेसे वाटते…की ‘रंजिश ही सही’ या गझलेनंतर अहमद फ़राज़ यांनी काहीही लिहिलं नसतं तरी चाललं असतं इतकी अप्रतीम भावना आणि त्यावरची कारिगरी या गझलेत आहेत. उर्दू भाषा आणि गझलेवर प्रेम असणाऱ्या कोणत्याही माणसाने ‘रंजिश ही सही’ ही गझल ऐकली नाही असं होऊच शकत नाही.ही केवळ गझल नसून एक कलाकृती आहे. या गझलेने शायर अहमद फ़राज़ आणि गायक मेहदी हसन यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली. आयुष्यात एखादीच अशी भव्य, अद्वितीय गोष्ट करावी आणि आयुष्य संतुष्ट व्हावं तसं या गझलेनं फ़राज़ साहेब आणि हसन साहेबांना दान दिलं आहे.

विरोधाभास(paradox) हा उर्दू शायरीचा आत्मा आहे. जेवढा तीव्र विरोधाभास तेवढी शायरी अधिक सुंदर! मानवी जीवनही विरोधाभासानं भरलं आहे आणि म्हणूनच ज्याला शायरी समजली त्याला आयुष्य उमगलं किंवा ज्याला आयुष्य समजलं त्याला शायरी गवसली असे म्हणल्यास वावगं ठरणार नाही. रंजिश ही सही या गझलेमध्ये ज्या ताकदीनं विरोधाभास अहमद फ़राज़ यांनी उभा केला आहे तो क्या कहने…!!

कधी कधी आयुष्यात एखादी व्यकती ही अचानक सोडून जाते किंवा कायमची निघून जाते. ती व्यक्ती तुमच्या अस्तित्वाचाच भाग असते. ही जाणीव जर ती व्यक्ती गेल्यानंतर झाली तर फारच दुर्दैव. ती प्रेयसी-प्रियकर असू शकते. मित्र असू शकतो. जोडीदार असू शकतो कुणीही असू शकतो. अगदी गुरूसुद्धा….सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर प्लेटोला अथेन्समध्ये राहाणं मुश्किल झालं अन् तो तब्बल १२ वर्ष अथेन्स सोडून गेला…त्याच्या मनात अगदी ‘रंजिश ही सही’ सारखीच भावना असेल..

अशी प्रिय व्यक्ती, जिच्यावर आयुष्य उधळून दिलं होतं ती व्यक्ती, आयुष्यातनं निघून गेल्यानंतरजीवाची जी कासाविशी होते, काहिली होते ती भावना या गझलेत अक्षरश: उतरली आहे. प्रियकराची व्याकुळता आता पराकोटिला पोहोचली आहे. ती इतकी परोकोटिला पोहचली आहे की तो म्हणतो, रंजिश म्हणजे वैर. शत्रुत्व. माझ्याशी भांडण्यासाठी का होईना पण तू ये. माझं मन दुखावण्यासाठी का होईना, मला परत सोडून जाण्यासाठी का होईना पण तू ये. आपलं नातं पूर्वीसारखं नाहीये. नातं उरलं नाही हे मान्य आहे गं…पण लोक रितीसाठी का होईना ये

आपल्या प्रेमाची चर्चा सर्व जगभर झाली आहे. त्यामुळे येता जाता जो तो मला आपल्या नातं तुटण्याबद्दल विचारतो आहे. कोणाकोणाला कारणं सांगत बसावीत. माझ्यावर नाराज असलीस तरी लोकांसाठी ये.

मुक्तपणे हसणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच रडणंही आवश्यक असतं. रडणं हे देखील एक मोठं कॅथर्सिस असतं. अनेकदा असं होतं आपण हसणं विसरतो तसं रडणंही विसरतो. डोळ्यातून पाणी यायलाच हवं अशा क्षणांमध्येही पाणी येत नाही. सर्व संवेदना निबर, बधीर होऊन जातात. मग फराज़ साहेब म्हणतात, कित्येक वर्ष झालीत डोळे कोरडे ठाक आहेत. मी पोटभर रडलो देखील नाहीये. मला रडवण्यासाठी का होईना ये. मुझको रुलाने के लिए आ…

अजूनही मन खोटी आस लावून बसंलय. प्राणात शेवटची धुगधुगी उरली आहे…ती विझवायला का होईना ये…माझ्या या प्रेमाची काही तर जाणीव ठेव. नेहमी मीच तुला मनवतो. तू रुसलीस की तुझी समजूत काढतो. पण तू ही कधी माझी समजूत काढं..माझं मन वळवण्याचा प्रयत्न कर.

मनाची व्याकूळता ज्या ताकदीने ही गझल व्यक्त करते तेवढी दुसरी गझल माझ्या पाहण्यात नाही. या गझलेसाठी अहमद फ़राज़ यांना जेवढे सलाम करावेत तेवढे थोडे आहेत. काळाच्या ओघात दोन-तीन शेर असेही आहेत जे फ़राज़ साहेबांनी लिहिले नाहीत पण या गझलेच्या मीटरमध्ये अगदी चपखल बसणारे आहेत. आणि मेहदी हसन साहेब याचा उल्लेख करुन ते गात. हे शेर नुसतेच मीटरमध्ये बसतात असे नाही तर ‘सुभान अल्ला!!’‘क्या बात है!!’‘भई, क्या कहने!’ अशी हुकुमी दाद मिळवतील असे ते शेर आहेत.

माना के मोहब्बत का छुपाना है मौहब्बत
चुपके से किसी रोज जताने के लिए आ...
जैसे तुम्हे आतें हैं न आने के बहाने
वैसे ही किसी रोज न जाने के लिए आ

गोष्टी व्यक्त केल्यात की अनेकदा त्यातलं सौंदर्य संपतं. सत्य हे अनावृत असावं आणि सौंदर्य हे आवृत् तसं. त्यामुळे प्रेम व्यक्त न करणं, त्याचा इज़हार न करणं म्हणजेच प्रेम. पण हे खरं असलं तरीही हळूच कधीतरी प्रेम व्यक्त करायला ये…तुला माझी भेट टाळण्यासाठी हजारो बहाणे, कारणं सुचतात…पण कधीतरी न जाण्यासाठी ये….

बंडखोर आणि रोमँटिक असं अनोखं मिश्रण असलेले शायर म्हणजे अहमद फ़राज़. प्रचंड लोकप्रियता आणि प्रेम ज्यांच्या वाटयाला आलं असे ते शायर होते. एका मुशाय-यात गेले असताना एक मुलगी त्यांच्याकडे स्वाक्षरी मागायला आली. फ़राज़ साहेबांनी तीला तीचं नाव विचारलं तर तीने फ़राज़ी असं सांगितलं. फ़राज़ साहेब चकित झाले. कारण आजवर मुलीचं फ़राज़ी हे नाव त्यांनी कधी ऐकलं नव्हतं. तीला त्यांनी स्पष्टीकरण मागितलं असता ती म्हणाली, माझ्या जन्माच्या वेळी आई वडिलांनी ठरवलं होतं मुलगा झाला तर फ़राज़ नाव ठेवायचं. मुलगी झाली म्हणून फ़राज़ी ठेवलं. त्यावर

और फ़राज़ चाहिएँ कितनी मोहब्बतें तुझे

माओं ने तेरे नाम पर बच्चों का नाम रख दिया

असा शेर लिहिला….हमखास दाद मिळालीच पाहिजे असे शेर लिहावेत तर फ़राज़ साहेबांनीच…

न जाने कैसे लोग याँदों के सहारे जीते है फ़राज़
मैं तो कई बार मरता हूँ इक याद आने पर 
वा
ज़िंदगी से यही गिला है मुझे
तू बहुत देर से मिला है मुझे 
तू मोहब्बत से कोई चाल तो चल
हार जाने का हौसला है मुझे

जनरल ज़िया उल हक यांच्या हुकुमशाहीवर टीका केली म्हणून फ़राज़ साहेबांना पाकिस्तानातून बाहेर जावं लागलं. काही काळ त्यांना तुरूंगवासही सहन करावा लागला. ते बरीच वर्ष युरोप अमेरिकेत होते. देशातून बाहेर पडावं लागलं याचं अहमद फ़राज़ांना अतीव दु:ख होतं. त्या वेदनेतून, देशाच्या आठवणीतून रंजिश ही सही लिहल्या गेली असंही अनेकांचं मत आहे. या गझलेवर जेवढा अधिकार फ़राज़ साहेबांचा आहे त्यापेक्षाही जास्त अधिकार मेहदी हसन साहेबांचा आहे. आणि खुद्द फ़राज़ साहेबांनीही हे मान्य केलंय. प्रसिद्ध संगीतकार निसार बज़्मी यांनी यमन रागात संगीतबद्ध केलेली ही गझल १९७१ साली ‘मोहब्बते’या पाकिस्तानी चित्रपटात प्रथम मेहदी हसन यांनी गायली आणि नंतर ती त्यांचीच झाली. इकबाल बानो यांनी ही वेगळ्या चालीत गायली आहे. पण ती काही गुणगुणावी अशी नाहीये. यमन रागातली निसार बज़्मी यांनी बांधलेली चाल फारच अप्रतीम आहे. यमन हा संध्याकाळचा राग आहे. सुखकर्ता दुखहर्ता या आरतीपासून श्रीराम चंद्र कृपालू भज मन या भजनापर्यंत सर्व काही तुम्हाला यमनमध्ये सापडेल. ये ‘मन’है असं यमन बद्दल म्हणतात ते उगाच नाही. मी नेहमी गमतीने म्हणते, यमन रागाचं जर personification केलं तर मी यमनशी लग्न करेन
अतिशय गोड आणि मेलोडियस अशा चाली यमनमध्ये बांधल्या गेल्या आहेत. मेहदी हसन यांच्या मखमली आवाजात ती ऐकणं हा खरंच स्वर्गीय अनुभव आहे. गझल ही शब्दप्रधान गायकी आहे आणि शब्दांना ट्रिट कसं करावं हे मेहदी साहेबांकडून शिकावं. रंजिश ही गाताना एका कडव्यात आख़िरी या शब्दाला ते असं ट्रिट करतात की खरंच आता शेवटची घटका आली आहे असंच वाटतं. स्वरांवर प्रचंड हुकुमत आणि ठहराव हे मेहदी हसन साहेबांच्या गायकीचं वैशिष्टय.मेहदी हसन साहेबां व्यतिरिक्त  जगजीत सिंग, हरिहरन, तलत अज़िज़, सुरेश वाडकर इत्यादी पुरूष गायकांनी ही गझल गायली आहे. पण कुणीही त्याला न्याय देऊ शकलेला नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. सुरेश वाडकर तर ही गझल गाताना गरीब वाटतात. त्या तुलनेत अली सेठीने कोक स्टुडिओमध्ये गायलेली रंजिश ही सही छान वाटते ऐकायला. जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेली रंजिश ही सही यू टयूबवर आहे. पण ती ऐकताना आयुष्यात (पहिल्यांदाच आणि शेवटचं पण) ‘जनाब जगजीत सिंग साहब कोशिश कर रहें हैं गाने की’ असं वाटतं. चित्रा सिंग यांनाही ताण येतो आहे गाताना अशी भावना होते. 
जगजीत यांनी ही गझल गाताना आजवर कुठेही कधीही न आलेला एक शेर ऐकवला आहे. तो अर्थातच फ़राज़ साहेबांचा नाही. पण मीटरमध्ये मस्त बसतो आणि अर्थही मोठा खोडकर आण सर्व धर्मगुरूंच्या दांभिकपणाची खिल्ली उडवणारा आहे. 

माना तुझे पीने की, आदत नहीं वाईज़ (धर्मोपदेशक धर्मगुरू)
मयख़ाने(मदिरालय) की रौनक ही बढ़ाने के लिए आ...

मेहदी हसन साहेबांच्या खालोखाल मला ही गझल कुणी गायलेली आवडली असेल तर ती म्हणजे रुना लैला आणि मंजिरी नावाच्या गायिकेनं. या दोघींनी या गझलेला खूपच न्याय दिला आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. रुना लैला यांनी गाताना काही जागा फारच लाजवाब घेतल्या आहेत. पहिल्या कडव्यात रस्मों रहें दुनिया ही निभाने के लिए आ यातलं आSSSSS हे त्या इतकं सुंदर आणि आर्ततेने गातात. मंजिरी ही नवीन गायिका आहे तीच्या ख़्याल या कार्यक्रमात तीने ही गझल गायली आहे. क़ाबिल ए तारिफ़!!म्हणावी अशीच गायली आहे. रसिकांनी मंजिरी, रूना लैला, अली सेठी यांना जरूर ऐकावं...जगजीत आणि इतरांच्याही ऐकायला हरकत नाही म्हणजे फरक लक्षात येईल. 
शेवटी अहमद फ़राज़ साहेबांची संबंधित एक छोटीशी आठवण सांगाविशी वाटतेय. माझ्या मॅडम डॉ. नय्यर परवीन सिद्दिक़ी या अहमद फ़राज़ यांच्या साहित्यावर उर्दूमध्ये पीएचडी करत होत्या. २००४-५ साल असावं. एकदा परवीन मॅडमच्या घरी गेले असताना त्यांनी थेट पाकिस्तानातून आलेलं फ़राज़ साहेबांचं पत्र दाखवलं. हाताने लिहिलेलं...शिल्पासारखी उर्दू लिपी...अप्रतीम हस्ताक्षर असलेलं ते पत्र...शिल्प समोर ठेवलंय असंच वाटावं जणू..लिपी कळली नाही...पण त्या पत्रातल्या अक्षरांवरून मी हात फिरवला..वाटलं आपण फ़राज़ साहेब भेटले असते तर नमस्कार केला असता...पण हे ही नसे थोडके...हा लेख वाचणाऱ्या कोणाच्याही आयुष्यात रंजिश ही सही हे म्हणण्याची वेळ येऊ नये या शुभेच्छांसह...पण संध्याकाळी कॉफी पीत पीतही गझल ऐका मात्र जरूर!







RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments