पीएच.डी.करणा-या संशोधक विदयार्थ्यांचे होणारे आर्थिक ,मानसिक , लैंगिक शोषण हा देशव्यापी आणि गंभीर विषय आहे . वर्षानुवर्षे सर्वत्र हे घडत आहे, मात्र कोणी ब्र काढत नाही . तामिळनाडूतील एका जिगरबाज तरुणाने हिंमत दाखवत थेट राज्यपालांपुढेच तक्रारींचा पाढा वाचला आहे.रवींद्र चिंचोलकर यांचा लेख
तामिळनाडू राज्यातील भारतीयार विदयापीठात 14 ऑक्टोबर 2024 रोजी दीक्षांत समारंभ होता. त्यासाठी विदयापीठाचे कुलपती तथा तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी उपस्थित होते . समारंभास सुरुवात झाली आणि इंग्रजी विषयात पीएच.डी .करणा-या प्रकाश नावाच्या संशोधक विदयार्थ्यांने मंचावरच पदवी स्वीकारताना राज्यपालांना निवेदन दिले .व्यासपीठावरील अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला , मात्र या विरोधाला न जुमानता प्रकाश आणि इतर दोन विदयार्थ्यांनी निवेदन राज्यपालांकडे सुपूर्द केले.
या निवेदनात संशोधक प्रकाशने पीएच.डी. करणा-या विदयार्थ्यांची आर्थिक लूट व छळ कोण – कोणत्या प्रकारे होतो याविषयीचा तपशील दिला आहे .त्यात म्हटले आहे
- मार्गदर्शक संशोधकाकडून 50 हजार ते एक लाख रुपये गुरुदक्षिणा उकळतात .
- मार्गदर्शक संशोधकाकडे सोन्याच्या दागिण्यांची मागणी करतात .
- मार्गदर्शक कधी – कधी विदयार्थ्याला त्याचे एटीएम कार्ड देण्याची सक्ती करतात .
- मार्गदर्शकासाठी संसोधकाला भाजी आणणे, भांडी घासणे ,बँकेतली कामे करणे, त्यांच्या मुलांना सांभाळणे अशी कामे करावी लागतात .
- मौखिक परीक्षेच्या वेळी मार्गदर्शक संशोधकाला मोठा खर्च करण्यास भाग पाडतात .
- मार्गदर्शक संशोधक विदयार्थ्याला कधीच सन्मानाची वागणूक देत नाहीत .
- विदयापीठे विदयार्थ्याकडून मोठे शुल्क आकारतात मात्र त्या तुलनेत काहीच सुविधा दिल्या जात नाहीत .
मार्गदर्शकांच्या मागण्यांना ‘नाही’ म्हटले किंवा त्यांचे पालन करण्यात अयशस्वी ठरले तर ते मार्गदर्शक सूड घेतात व त्या विदयार्थ्याची पीएच.डी.पूर्ण होऊ देत नाहीत. या भीतीने संशोधक सर्व छळ सहन करतात असेही या विदयार्थ्याने निवेदनात म्हटले आहे. .
हे सारे होऊनही या संशोधक विदयार्थ्यांनी दिलेल्या निवेदनाची साधी दखल कोणी घेतली नाही. संशोधक विदयार्थ्यांच्या समस्या सोडवू असे कोणीही म्हटले नाही .पीएच.डी.च्या विदयार्थ्यांच्या होणा-या लुटीस आणि छळास शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची मूक संमती असते , हाच एकमेव अर्थ यातून निघतो.
तामिळनाडूत जे घडते त्यापेक्षाही भयंकर प्रकार आप्ल्या देशातील प्रत्येक राज्यात घडत आहेत. महाराष्ट्रही याला अपवाद नाही. मागील चार – पाच वर्षात उघडकीस आलेले काही प्रकार पाहिले तरी अंगावर काटा येतो. त्यातील काही उदाहरणे येथे जाणीवपूर्वक देत आहे.
पाच लाखाची मागणी
घटना क्र. एक – छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. रफिक झकेरिया महिला महाविदयालयाच्या ग्रंथपालाने ( मार्गदर्शक ) पीएच.डी. संशोधक विदयार्थ्याला शिष्यवृत्तीमधील प्रतिमहिना दहा हजार यानुसार चार वर्षांचे मिळून पाच लाख रुपयांची लाच मागितली. मार्गदर्शिकेच्या मुलाने व्यवहार ठरवला. त्यातील 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना ऑगस्ट 2024 मध्ये मार्गदर्शिकेच्या मुलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी ग्रंथपाल, तिच्या दोन मुलांसह ग्रंथालय परिचारकाच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला. महाविद्यालयाने ग्रंथपाल महिलेला निलंबित केले आणि विदयापीठाने गाईडशिप रद्द केली.
विनयभंग
घटना क्र दोनः – नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील शिक्षणशास्त्र संकुलात एक ३४ वर्षीय विद्यार्थिनी पीएच .डी . साठी संशोधन करीत आहे . तिला तिच्या मार्गदर्शकांनी त्रास द्यायला सुरुवात केली . विनयभंगापर्यंत हे प्रकरण गेले . शेवटी विद्यार्थिनीने भवितव्याची चिंता न करता जानेवारी 2024 मध्ये नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली . महिला आयोगाकडेही तक्रार केली .
तक्रारी नोंद होतात पण विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही येथेही हेच घडले आहे . विद्यार्थिनीलाच तक्रार मागे घेण्यास धमकावले जात आहे .
लैंगिक छळ
घटना क्र 3- छत्रपती संभाजीनगर येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठातील नाटयशास्त्र विभागातील एका प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली एक विदयार्थिनी पीएच.डी. करीत होती. या प्राध्यापक महाशयांनी या विदयार्थिनीलाच आपल्या घरी आणून तेथेच राहायला भाग पाडले . त्या प्राध्यापकाने घरी तिचा सतत लेंगिक छळ केला. शेवटी त्या विदयार्थिनीने मार्गदर्शक असलेल्या प्राध्यापकाविरुध्द लैंगिक छळ केल्याची तक्रार एप्रिल 2023 मध्ये पोलिसात दाखल केली. केली तेव्हापासून तो प्राध्यापक फरार आहे .
दोघींचा छळ
घटना क्र. चार- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विदयापीठाच्या हिंदी विभागातील दोन विद्यार्थिनींनी संशोधन आराखडा तयार करुन मार्गदर्शकास दाखविला. या प्राध्यापकाने तो आराखडा मंजूर करण्यासाठी त्या दोन विदयार्थिनींचा लैंगिक आणि आर्थिक छळ केल्याची तक्रार 2022 साली त्यावेळचे कुलगुरु डॉ . सुभाष चौधरी यांच्याकडे दाखल झाली होती. हा विषय विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत गाजला. सिनेटच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन एक चौकशी समिती नेमण्यात आली होती .
गाईडशिप गमावली.
घटना क्र. पाच – छत्रपती संभाजीनगर येथे पीएच.डी. प्रबंधावर सह्या करण्यासाठी पैशांची मागणी केल्या प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुखानी गाईडशीप गमावली . याप्रकरणी येमेन देशाचा विद्यार्थी मो.अब्दुल्ला अलमसुदी याने 2021 साली विदयापीठाचे त्यावेळचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच फॉरेन ॲम्बेसीकडे लेखी तक्रार केली यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विदयापीठाची बदनामी झाली .
सोपे गणित
घटना क्र. सहा – एका प्राध्यापिकेला पीएच.डी.साठी मार्गदर्शन करण्याची फार हौस होती. तिने विदयापीठाकडे मागणी केली केवळ आठच विदयार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल हा नियम जाचक आहे. मला पंधरा विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची परवानगी दया. विदयापीठाने विदयार्थी वाढवून दिले नाही. नव्यानेच आलेल्या एका संशोधक विदयार्थ्यार्ला तिने सोपे गणित समजावले. जर पुरुष गाईड मिळाला असता तर तुला त्यांना वेळोवेळी दारु – मटनाच्या पाटर्या दयाव्या लागल्या असत्या. ते जातील तिथे त्यांच्याबरोबर हमालासारखे जाऊन त्यांचा खर्च करावा लागला असता. भेटवस्तू, मौखिक परीक्षेच्या वेळचा खर्च असा आठ लाख खर्च झाला असता. मला पाटर्या नकोत, माझ्याबरोबर हमाली करत फिरावेही लागणार नाही, तू आठ लाख नको फक्त पाच लाखच दे. विदयापीठाने त्यांना पंधरा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची परवानगी दिली असती तर ?
गुत्तेदार
घटना क्र. सात – एका प्राध्यापकाला श्रीमंत विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणे खूप आवडायचे. ते त्याला सांगायचे तू फक्त परीक्षेला ये, प्रबंधाचा विषय निवडण्यपासून, त्याचे लेखन , प्रिंटिंग, बाईंडिंग मी करुन देईन. फक्त गुरुदक्षिणा वेळोवेळी दे. ते विदयापीठात त्यांच्या कार्यालयात शेजारी एका डीटीपी ऑपरेटरला घेऊन बसायचे. ज्यांच्याकडून गुत्ते घेतले आहे, त्यांच्या प्रबंधाचे डिक्टेशन दिवसभर चालायचे. सरकारचा अडीच लाख रुपये महिना पगार घेऊन, विदयार्थ्यांना शिकवायचे नाही, कोणत्याही विषयावर प्रबंध लिहून देण्याचा साईड बिझिनेस मात्र जोरात चालायचा . पीएच.डी . मार्गदर्शन क्राण्यास आम्ही एवढा वेळ देतो, बुध्दी वापरतो,पाण एक रुपयाही मानधन मिळत नाही .मग संसोधक विदयार्थ्यांकडुन पैसे घेण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय काय असा युक्तीवाद मार्गदर्शक करतात.
ही काही उघड झालेली उदाहरणे हिमनगाचे टोक आहे. अनेक विदयार्थी आपले हात दगडाखाली अडकले आहेत म्हणून हे मुकाट सहन करतात. मार्गदर्शक खरोखर मार्गदर्शन करतात का हा पुन्हा वेगळाच विषय आहे.
विदयापीठांकडून लूट
खाजगी विदयापीठात पीएच.डी. करण्यासाठी दरवर्षी सरासरी एक लाख रुपये फी असते. मार्गदर्शकाला गुरुदक्षिणा देणे , कोर्स वर्क , मौखिक परीक्षेच्या वेळीचा खर्च, प्रबंध छपाईचा खर्च हे लक्षात घेतल्यास संशोधकाचा किमान सात लाख खर्च होतो. सरकारी विदयापीठेही फी आणि दंडाच्या नावाखाली प्रत्येक विदयार्थ्याकडून चार ते पाच वर्षात किमान दोन लाख वसूल करतात.
या बदल्यात विदयापीठ त्यांना काय देते? कोर्सवर्कची परीक्षा आणि मौखिक परीक्षा संशोधन समितीची सहामाही बैठक, ही तीनच कामे विदयापीठ करते. यावर विदयापीठाचा प्रती विदयार्थी वीस हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च होत नाही. विदयार्थ्याकडून जर 50 रुपयांचा पात्रता फॉर्म भरायला राहिला तर विदयापीठ आठवण करुन देत नाही. सहामाही रिपोर्ट नाही दिला तरी आठवण करुन देत नाही. विदयार्थी मागेल तेवढी वर्षे प्रबंध सादर करण्यास मुदत वाढवून दिली जाते, मात्र या बदल्यात शेवटी दोन लाखापर्यंत दंड वसूल केला जातो. एकटया पात्रता फॉर्मचा दंड दीड लाख झाला तो भरा असे सांगितले जाते. 50 रुपयाचा पात्रता फॉर्म भरायला विदयार्थी विसरला तर दीड लाख रुपये दंड घेणे दरोडेखोरांनी घेतलेल्या लुटीसारखेच आहे. दंड भरण्याची ऐपत नाही म्हणून पीएच.डी. सोडलेले अनेक विदयार्थी आहेत.
पीएच.डी. चा विषय ठरविताना मार्गदर्शक एक विषय ठरवून देतात. संशोधन समिती हा विषय चालणार नाही म्हणत दुसराच विषयावर गळयात मारते. विदयार्थ्याला मार्गदर्शक कोण असणार तेही विदयापीठच ठरवून देते. त्यामुळे विदयार्थ्याला आवडी- निवडीचा विचारच होत नाही.
प्रवेश अर्जातून कमाई.
विदयापीठ पीएच.डी प्रवेश परीक्षेसाठी (पेट) अर्ज मागविते.किमान पाच – सहा हजार अर्ज येतात. एका अर्जास दोन हजार रुपये फी म्हटले तर त्यातूनच दहा लाखाची कमाई होते. खाजगी विदयापीठे पेट परीक्षेच्या अर्जास सरासरी प्रत्येकी पाच ह्जार रुपये घेतात. त्यातील बहुतेकांना प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण केले जाते. मग मुलाखतीस बोलावले जाते, मुलाखतीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये भरावे लागतात . यातूनच कोटयवधी रुपये कमावले जातात. मुलाखतीस बोलवल्यापैकी पाच टक्के विदयार्थ्यांचीही निवड होत नाही.
अशा असंख्य अडचणीचा सामना करणा-या संशोधक विदयार्थ्यांनी संशोधन मात्र दर्जेदार , जागतिक स्पर्धेत टिकेल असे करावे अशी सर्वांची अपेक्षा असते. त्याने स्कोपस जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित करावे अशी अपेक्षा केली जाते.
मुळात नोकरीसाठी अट आहे म्हणून 95 टक्के विदयार्थी पीएच.डी.च्या वाटेला जातात. संशोधक विदयार्थ्यांच्या या अडचणीचा फायदा घ्यायला सारेच टपलेले असतात. खाजगी सावकारही एखादयाला जेवढे नाडत नाही तेवढे या विदयार्थ्यांना नाडले जाते.
विशेष म्हणजे विदयार्थ्याना त्यांच्या मनाप्रमाणे ,दबावमुक्त आणि विनाखर्चिक संशोधन करता यावे यासाठी उजवी, डावी कोणतीच विदयार्थी संघटना आवाज उठवत नाही.
प्राध्यापक होण्यासाठी नेट – सेट ची अट असताना पीएच.डी.चे लोढणे का गळ्यात घालण्यामागचे तर्कट काय? याचा जाब शिक्षण व्यवस्थेला कोणी विचारत नाही.
प्राध्यापक, विदयापीठे, उच्च शिक्षण विभाग, सरकार यांची या विषयावर अळीमिळी गुपचिळी आहे, कोणालाच काही वाटत नाही. आंधळे दळते आहे, कुत्रे पीठ खात आहेत अशी संशोधक विदयार्थ्यांची अवस्था आहे.