सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद
सोलापूर – भाषा व वाङमयामुळे समाज व संस्कृती टिकून आहे. समाज जोडण्याचे काम भाषेमुळे निरंतर होत असते. भाषा व वांङमयातील नव्या प्रवाहांवर अभ्यासक व संशोधकांनी संशोधन करावे, असे आवाहन भाषा संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वांग्मय संकुलाच्यावतीने पीएम उषा विभाग यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवशीय भाषा व वांङमय विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. गौतम कांबळे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बारामतीचे डॉ. राजकुमार कदम, पीएम उषा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गणेश संकपाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. आयेशा पठाण यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नेपाळ काठमांडू येथील डॉ. एक प्रसाद दुवादी यांनी ऑनलाईन माध्यमातून उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले.

डॉ. गौतम कांबळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वाङमय संकुलामध्ये एकूण आठ भाषा विभाग सुरू असल्याचे सांगितले. या माध्यमातून सर्व भाषेला महत्त्व देण्याबरोबरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारतीय ज्ञानपरंपरेचा देखील येथे अध्ययन, अध्यापन केले जाते असे सांगितले. भाषा संकुलाच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्र व संपूर्ण देशातून एकूण 450 जणांनी नोंदणी करून परिषदेत सहभागी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. त्याच बरोबर विविध विषयांवर चर्चा व मंथन होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉ. आयेशा पठाण यांनी मानले.