Monday, October 7, 2024
Homeलेखमोहविणारे पुष्प प्रदर्शन

मोहविणारे पुष्प प्रदर्शन

आम्ही कुटुंबीय जेव्हाही  पर्यटनास जाण्याचा विचार करतो, तेव्हा आमची प्रवासयोजना आम्हीच आखतो. यात सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे मनसोक्त हुंदडता येते. जिथे मन रमेल तिथे हवा तितका वेळ थांबता येते, त्या -त्या भागातील खास पदार्थांची चव चाखता  येते. मुख्य म्हणजे नव-नवी आणि तऱ्हेतऱ्हेची माणसे भेटतात . या माणसांनी सहकार्य करुन आमच्या सहलीचा आनंद वाढविला आहे.आमच्या आजवरच्या सर्व सहली त्यामुळे आनंददायी झालेल्या आहेत .

दरवर्षी किमान एक आठवडा भारतात कुठेतरी फिरायचेच हा नियम आम्ही केला आहे. गतवर्षी कर्नाटकातील उडुपी परिसरात असलेल्या समुद्र किनाऱ्यांची सैर केली . एका बाजूस पश्चिम घाटाचे हिरवाईने नटलेले उंच उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आणि सुंदर समुद्र किनारे हे ये तेथील वैशिष्ट्य आहे. उडुपीच्या आसपास जवळपास आठ समुद्र किनारे भेट देण्यासारखे आहेत. प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे काहीतरी वेगळेपण आहे. त्यात मुर्डेश्वरचा समुद्रकिनारा तर अप्रतिमच . तुम्हाला जर स्वच्छ , सुंदर आणि गर्दी नसलेले समुद्र किनारे पाहायचे असतील तर उडुपीला तोड नाही .

गतवर्षी अरबी समुद्र पाहिला, यावर्षी बंगालचा उपसागर आणि परिसर पाहू असे ठरविले . त्यामुळे पाँडिचेरी आणि आसपासच्या परिसरात फिरण्याची योजना आखली . सोलापूरहून रेल्वेने चेन्नईला गेलो आणि तेथून इलेक्ट्रीक बसने पुद्दुचेरीच्या प्रवासाला सुरुवात झाली . बंगाल खाडीच्या  कडेकडेने जाणाऱ्या पूर्व किनारा महामार्गावरून ( ईस्ट कोस्ट रोड ) प्रवास करणे केवळ अनुभवावे असेच आहे. सर्वत्र पाणी आणि झाडे , त्यातून होणारा आपला प्रवास . या महामार्गावरून दीडशे किलोमीटरचे अंतर पार करीत आपण  पुद्दुचेरीला केव्हा पोहोचतो ते लक्षातही येत नाही .

पाँडिचेरीचा अर्थ आहे नवे शहर . फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने 1674 साली पाँडिचेरी येथे व्यापारी केंद्र सुरु केले . तेव्हापासून पाँडिचेरी हे परकीय आणि भारतीयांचे आकर्षणाचे केंद्र बनले . 1954 सालापर्यंत पाँडिचेरी फ्रान्सच्या ताब्यात होते .अजूनही येथे मोठ्या प्रमाणात फ्रेंच लोक राहतात,या भागाला व्हाईट टाऊन असे म्हणतात . पाँडिचेरीला भारतातील छोटा फ्रान्स असेही संबोधले जाते. पाँडिचेरी हे नाव बदलून आता पुद्दुचेरी करण्यात आले आहे . येथे फ्रान्ससह अनेक देशांचे लोक भारतीय नागरिकत्व स्वीकारून साधेपणाने आणि आनंदात राहतात .

पुद्दुचेरीत अरविंद आश्रम आणि ओरोविले ही दोन महत्वाची स्थळे आहेत . ही दोन्ही स्थळे स्वामी अरविंदांचा वारसा जपतात .स्वामी अरविंदांनी साधनेसाठी पाँडिचेरीची निवड केली, त्यातूनच 1926 साली  अरविंद आश्रमाची निर्मिती झाली . अरविंदांच्या शिष्या मिरा अल्फासा  फ्रान्समधून भारतात येऊन त्यांच्या सानिध्यात राहिल्या. त्यांनीच ओरोविलेची (माता मंदिराची ) स्थापना केली . या मातामंदिरासाठी 124 देश आणि भारतातील 23 राज्यातील माती उपयोगात आणली आहे. खऱ्या अर्थाने हे जागतिक केंद्र असावे असा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. मातृमंदिराची रचना एकमेवाद्वितीय आहे. हे मातृमंदिर बाहेरून खूप आकर्षक आहे मात्र, आतून पाहिल्यास सकारात्मक अनुभूती मिळते.अरविंद आश्रम, ओरोविले , मंदिरे, चर्च आणि समुद्र किनारे पाहावे तितके कमी आहे. रुचकर खाद्य पदार्थांची लयलूट आहे. कामकरी लोक केवळ तमिळ भाषा बोलत असल्याने भाषेचा थोडा अडसर जाणवतो . पदार्थाकडे बोट दाखवून मागावे लागायचे . मूक भाषेतच संवाद चालायचा . पण शंभर रुपयात चौघांचा पोटभर नाश्ता होईल एवढी स्वस्ताई आहे.

पुद्दुचेरीतील वास्तव्यात आम्हाला सर्वाधिक भावले ते पुद्दुचेरी सरकारच्या कृषी विभागाने दीडशे एकर परिसरात विस्तारलेल्या बॉटनिकल गार्डनमध्ये आयोजित केलेले पुष्प, भाज्या आणि वनस्पतीचे प्रदर्शन . दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. आम्हाला हे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळाली. या प्रदर्शनात 50 हजारांपेक्षा अधिक फुलझाडे प्रदर्शित करण्यात आली होती . जागोजागी फुलांची आकर्षक सजावट करून त्या द्वारे विविध आकार दर्शविण्यात आले होते .

फुलांच्या प्रदर्शनात दाखल होताच आपण जणू व्हॅली ऑफ फ्लॉवरमध्ये आहोत असा भास होत होता . जिकडे तिकडे विविध रंगांची हजारो फुलझाडे, आकर्षक पुष्परचना लक्ष वेधत होत्या . प्रवेश द्वाराजवळच गुलाबी आणि गडद गुलबक्षी रंगाची सदाफुलीची फुले खूप छान दिसत होती . पुढे गेल्यावर लाल,पिवळ्या. पांढऱ्या . केशरी आणि जांभळ्या रंगाची सुंदर जरबेराची फुले पाहायला मिळाली . नंतर ऑर्कीड ची गुलाबी आणि लाल रंगाची फुले पाहिली . त्यानंतर रांगेने पिवळी आणि पांढरी शेवंतीची फुले पाहायला मिळाली .पिवळ्या आणि गडद केशरी रंगाची झेंडूची फुले मनाला सुखावत होती . लाल ,केशरी, निळ्या, पांढऱ्या, पिवळ्या रंगाची गुलाबाची फुले इंद्रधनुष्यच पाहतो आहोत असा आभास निर्माण करीत होती . माहित असलेली आणि नसलेली विविध रंगांची फुले डोळ्यांना सुखावत होती .पुढे गेल्यावर छान पुष्परचना पाहायला मिळाल्या .बोनसाय केलेले वडाचे , लिंबाचे आणि इतर झाडे लक्ष वेधून घेत होती . 

प्रदर्शनात विविध फळांवर  सुंदर कार्व्हिंग केलेले होते . टरबुजावर केलेले कार्विंग अप्रतिम होते.कारल्यापासून मोठे जहाज बनवले होते .गाजरांचा वापर करून मोठा नंदी बनवला होता .वेगवेगळे धान्य आणि कडधान्य वापरून तसेच फुले वापरून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या .  धान्य चिटकवून मोर बनवला होता . धान्यापासून कथकली नृत्याचा मुखवटा बनवला होता .

 या फुले आणि वनस्पतीच्या प्रदर्शनाला जोडून कृषी साहित्याचे प्रदर्शन आणि विक्रीची दालने होती . यात कृषी उपयोगाच्या छोट्या वस्तूंपासून अगदी ट्रॅक्टरपर्यंत अनेक उपकरणे होती . मत्स्य प्रदर्शनही होते.

या प्रदर्शनात सर्वात आवडलेली बाब म्हणजे या प्रदर्शनाला भेट देण्यास सर्व वयोगटातील लोक आनंदाने येत होते. परत जाताना प्रत्येकजण फुलझाडे आणि फळझाडांची रोपे घेऊन जात होते. ही रोपे नेताना त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह पाहून सकारात्मक उर्जा मिळाली. जर सरकारने थोडा पुढाकार घेतला तर लोक दुप्पट उत्साहाने कामाला लागतात हे पाहून समाधान वाटले .माझ्या शहरात जर असे प्रदर्शन असते तर मीही किमान आठ -दहा फुलझाऊंची रोपे घेतली असती असे मनोमन वाटले .

महाराष्ट्रात असे प्रदर्शन पुण्यात होते असे वाचले आहे. पण फक्त पुण्यापुरते हे घडून फार बदल घडणार नाही . महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात दरवर्षी असे प्रदर्शन भरले तर कृषी क्षेत्राचा मोठा विकास होऊ शकेल . पुद्दुचेरी येथील कृषी विभाग सलग 34 वर्षे जर या प्रदर्शनाचे आयोजन करीत असेल तर कृषीप्रधान म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी असे आयोजन शक्य आहे. महाराष्ट्राच्या कृषी विभागाने यादृष्टीने प्रयत्न करावेत ही अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments