Monday, October 7, 2024
Homeअर्थकारणलाडक्या बहिणी,भावांची दिवाळी गोड होणार?

लाडक्या बहिणी,भावांची दिवाळी गोड होणार?

मुंबई – महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना जाहीर केल्या आहेत . या योजना लाडक्या बहिणी, भावांची दिवाळी गोड करणार की आचार संहितेचे कारण देत या योजना रखडणार असा संभ्रम लाडक्या बहिणी आणि भावांच्या मनात निर्माण झाला आहे .

या योजनांकडे प्रत्येक जण आपल्या चष्म्यातून पाहात आहे, काहींना या योजना चांगल्या वाटतात, तर काहींना निवडणूक जवळ आल्याने जुमला वाटत आहे. लाडक्या बहिणींसाठी आधी योजना जाहीर झाली , तेव्हा लाडक्या भावांना आपले काय ?असा प्रश्न पडला .काहींनी तर घाईघाईत लाडकी बहीण योजनेचा निषेध केला .सरकार महिला तुष्टीकरण करून समस्त पुरुष वर्गावर अन्याय करीत आहे, अशा भावना काहींनी व्यक्त केल्या . काहींनी पुरुषांनी तर सरकार च्या महिला तुष्टीकरण धोरणाचा निषेध म्हणून अंतर्वस्त्रे जाळली . शासनाने लाडका भाऊ योजना जाहीर केली तेव्हा त्यांचाही जीव भांड्यात पडला .

महाराष्ट्रात अडीच कोटीपर्यंत अर्ज येऊ शकतात

ज्या कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा  21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे . आतापर्यंत 50 लाख महिलांचे अर्ज दाखल झाले आहेत .पात्र महिलांना दीड हजार रुपये महिना मदत मिळणार आहे .  यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवून 31 ऑगस्ट 2024 करण्यात आली आहे . मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन योजना जानेवारी 2023 मध्येच जाहीर करण्यात आली होती . 30एप्रिल 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख होती . 10  जून 2023ला महिलांच्या खात्यात पहिला हप्ता आला मध्य प्रदेशची निवडणूक नोव्हेंबर 2023च्या शेवटी होणार होती त्यामुळे त्यांना आचारसंहितेचा अडथळा आला नाही . महाराष्ट्रातील निवडणुकीस खूप कमी अवधी उरला आहे .मध्य प्रदेशात या योजनेच्या 1 कोटी 30 लाख लाभार्थी आहेत. माहाराष्ट्रात ही संख्या अडीच कोटीपर्यंत जाऊ शकते.

जास्तीत जास्त सहा महिने विद्यावेतन मिळणार

महाराष्ट्र सरकारतफे लाडका भाऊ योजना मुख्यमंत्र्यांनी 17 जुलै 2024 (आषाढी एकादशी)  रोजी जाहीर केली आहे .या योजनेनुसार अप्रेंटिस म्हणून काम करणाऱ्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास सहा हजार रुपये महिना, डिप्लोमा झालेल्यास आठ हजार रुपये महिना तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यास दहा हजार रुपये महिना मदत मिळणार आहे . शिकत असलेल्या विद्यार्थांना याचा लाभ मिळणार नाही . बेरोजगार असणे आणि अप्रेंटिसशिप करणे या अटी आहेत . अप्रेंटिस करण्यासाठी लागणारे विद्यावेतन राज्य सरकार देणार आहे . राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या आधीच जाहीर केली आहे . तीच योजना ‘लाडका भाऊ’ या वेगळ्या नावाने जाहीर केली आहे . राज्य सरकारने जारी केलेल्या यादीतील कंपन्यांमध्ये सहा महिने प्रशिक्षण घेण्यासाठी यात शुल्क मिळणार आहे .याचाच अर्थ सहा महिनेच हे पैसे मिळणार , एका विद्यार्थ्यास एकदाच प्रशिक्षण घेता येणार.या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही . म्हणजे लाडक्या भावासाठी जास्तीत जास्त 60 हजार रुपये मिळणार .

आचारसंहितेची अडचण येणार का?

या दोन्ही योजनांसाठी कोटयवधी अर्ज येणार हे स्पष्ट आहे . ‘या अर्जातून कोण पात्र आणि कोण अपात्र याचा निर्णय घेण्यात फार वेळ जाणार आहे . महाराष्ट्र शासनाने या योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत जाहीर केली आहे . ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र ठरतील त्यांना 1 जुलै 2024 पासून लाभ देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे . लाडका भाऊ योजनेची घोषणा मुख्यमंत्यांनी आषाढी एकादशी दिवशी केली . केवळ बेरोजगार असलेल्या 21 ने 35 वयोगटातील तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे . 

मात्र या योजनांचा लाभ लाडक्या बहिणींना आणि भावांना  कोणत्या तारखेपासून मिळणार याबाबत अमलबजावणीची तारीख जाहीर केलेली नाही .महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरपूर्वी होणार आहेत . त्यामुळे सष्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होईल .तोपर्यंत या योजनांच्या लाभार्थ्यांची यादी अंतिम होऊ शकेल की नाही यावर सगळे अवलंबून आहे. . त्यामुळे या योजना निवडणूक आचार संहितेच्या कचाटयात सापडतील असा अनेकांचा दावा आहे .

आम्ही लाडक्या बहिणींची आणि भावांची दिवाळी गोड करणार होतो, मात्र आचारसंहिता आडवी आल्याने आमचा नाईलाज झाला असे सांगता यावे अशा चलाखीनेच या योजना सरकारने जाहीर केल्या असे काहींचे म्हणणे आहे . त्यामुळे आशेवर असलेल्या लाडक्या बहिणींची आणि भावांची दिवाळी गोड होईलच याची खात्री नाही असे काही विश्लेषक सांगत आहेत . लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ मात्र दिवाळी गोड होणार अशी आशा बाळगून आहेत .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments