वॉशिंग्टनः लोकसंख्या वाढीत भारताने पहिला क्रमांक टिकविला असून 1 जानेवारी 2025 रोजी भारताची लोकसंख्या 141 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. भारतानंतर चीन आणि अमेरिका लोकसंख्येबाबत अनुक्रमे दुस-या व तिस-या क्रमांकावर आहेत. जगाची लोकसंख्या 809 कोटीपेक्षा अधिक झाली आहे. याचाच दुसरा अर्थ जगात जन्म घेणा-या प्रत्येक सहापैकी एक बालक भारतात जन्म घेते.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला जगाची लोकसंख्या 8.09 अब्ज झाली. 2024 मध्ये जगाची लोकसंख्या 7.1 कोटींनी वाढली आहे. अमेरिकेच्या सेन्सस ब्युरोच्या आकडेवारीनुसार ही माहिती आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत जगाची लोकसंख्या 809 कोटी 20 लाख 34 हजार511 इतकी आहे. हे 2024 च्या नवीन वर्षाच्या दिवसाच्या तुलनेत 7 कोटी 11 लाख 78 हजार 87 इतकी अधिक आहे. 2024 मध्ये 141 कोटी लोकसंख्या असलेला भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जानेवारी 2025 मध्ये जगभरात दर सेकंदाला 4.2 बाळांचा जन्म होईल आणि 2 लोकांचा मृत्यू होईल. 2024 मधील लोकसंख्या वाढ 2023 च्या तुलनेत कमी होती. 2023 मध्ये जगाची एकूण लोकसंख्या 7.5 कोटींनी वाढली होती.
अमेरिकेच्या जनगणनेनुसार, पुढील महिन्यात दर 9 सेकंदाला एका व्यक्तीचा जन्म होईल आणि दर 9.4 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होईल. प्रत्येक 23.2 सेकंदाला एक स्थलांतरित व्यक्ती देशाच्या लोकसंख्येत जोडली जात असल्याचा अंदाज आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे, ज्याची अंदाजे लोकसंख्या 140 कोटी 91 लाख 28 हजार 298 आहे. भारतानंतर 140 कोटी 79 लाख 29 हजार 929 लोकसंख्येसह चीनचा दुसरा क्रमांक लागतो. लोकसंख्येच्या बाबतीत अमेरिका जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. नवीन वर्षाच्या दिवशी त्याची लोकसंख्या 34 कोटी 11 लाख 45 हजार 670 असल्याचा अंदाज आहे. 2024 मध्ये अमेरिकेची लोकसंख्या 26 लाख 40 हजार 171 ने वाढली आहे.