Thursday, October 3, 2024
Homeलेखसरकारला संशोधक विद्यार्थी 'लाडके' का नाहीत?

सरकारला संशोधक विद्यार्थी ‘लाडके’ का नाहीत?

बार्टी, महाज्योती आणि सारथी ‘ या तीनही संस्थांतील संशोधक विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती दिलेली नाही . या  जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणून ,यापुढे निम्मीच रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देऊ आण्सेि मोजक्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ असे परिपत्रक 25 जुलै 2024 रोजी राज्य सरकारने काढले आहे . सनदशीर आंदोलनाला सरकार दाद देत नसल्याने आत्मदहनाच्या शेवटच्या मार्गापर्यंत विद्यार्थ्यांना येणे भाग पडते आहे. महाराष्ट्र सरकारसाठी संशोधक विद्यार्थी ‘लाडके’ नसून ‘दोडके’ का झाले आहेत . रवींद्र चिंचोलकर यांचा विशेष लेख

महाराष्ट्र सरकारतर्फे पीएच.डी.साठी संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती  योजनेमध्ये समानता आणण्याच्या नावाखाली25 जुलै 2024 एक शासन आदेश जारी करण्यात आला आहे . संशोधन शिष्यवृत्तीची रक्कम निम्मी करण्याचा आणि मोजक्याच विद्यार्थ्यांना संशोधन शिष्यवृत्ती देण्याचा हा शासन निर्णय म्हणजे  संशोधक विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा आहे . या शासन निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुणे येथे 5 ऑगस्ट 2024 पासून बार्टी च्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे . एका विद्यार्थ्याने तर आत्मदहनाचा प्रयत्न केला .

पार्श्वभूमी

मागास घटकांतील विद्यार्थ्यांना  सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तीन संस्थांची स्थापना केली यात अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), इतर मागासवर्गीय समाजासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तसेच मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव  विकास  संस्था (सारथी ) यांचा समावेश आहे . याच सामाजिक न्यायाचा भाग म्हणून या संस्थांमार्फत पीएच . डी . करणाऱ्या  संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते .

शिष्यवृत्ती सहज मिळत नाही

ही शिष्यवृत्ती सहज आणि कोणालाही मिळत नाही . सर्वप्रथम विद्यार्थ्यांना विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावी लागते , त्यानंतर विद्यापीठाची पीएच.डी पात्रता चाचणी (पेट) परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावी लागते , त्यानंतर बार्टी, महाज्योती किंवा सारथीची शिष्यवृत्ती परीक्षाही उत्तीर्ण करावी लागते .एवढया अग्निदिव्यातून पार पडल्यावर तरी संशोधन शिष्यवृत्ती मिळायला हवी . मात्र तसे होत नाही, लाल फितीचा कारभार जागोजागी आडवा येतो  . 

संशोधक विद्यार्थी म्हणतात सरकारकडे सर्वांना फुकट वाटायला भरपूर पैसे आहेत . आम्ही संशोधक विद्यार्थी भीक मागत नाही, हक्काची शिष्यवृत्ती मागतो . मात्र सरकारच्या दृष्टीने आम्ही एवढे ‘दोडके’ का झालो आहोत ? काय केल्यास सरकार आम्हाला  ‘लाडके’ मानायला तयार होईल ? असा प्रश्न आम्हाला पडला आहे .

शिष्यवृत्तीची प्रतिक्षा 

पीएच .डी . करण्यास ही संशोधन शिष्यवृत्ती मिळावी म्हणून महाराष्ट्रातील इच्छुक विद्यार्थ्यांनी बार्टी, महाज्योती तसेच सारथी या संस्थांमार्फत आयोजित परीक्षा दिली आहे . सारथी चे 1200, महाज्योती चे 1400  तर बार्टी चे 763  विद्यार्थी दोन वर्षांपासून संशोधन शिष्यवृतीची प्रतिक्षा करीत आहेत .

 या संशोधन शिष्यवृत्ती साठी विद्यार्थी 2022 पासून   विविध प्रकारे आंदोलन करीत आहेत . तेव्हाच वेळेत शिष्यवृत्ती मिळाली असती तर मागील दोन वर्षात आम्हा पीएच .डी . करणाऱ्या विद्यार्थ्यांचे  75 टक्के काम पूर्ण झाले असते . मात्र सरकार विरुद्ध आंदोलने करण्यातच आमचा वेळ जात आहे असे संशोधक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे . शिष्यवृतीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण केले, लाँग मार्च काढला, मुंडन केले . अगदी टोकाला जाऊन आत्मदहनाच्या प्रयत्नापर्यंत आंदोलने करून झाली . प्रत्येकवेळी मंत्र्यांनी  पोकळ आश्वासने देऊन विद्यार्थ्यांची बोळवण  केली . 

समान धोरण की फसवणूक?

विद्यार्थ्यांनी पीएच.डी. करण्यास शिष्यवृती मिळावी म्हणून केलेल्या  एवढ्या प्रखर आंदोलनानंतरही सरकारने विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे .  शिष्यवृत्तीसाठी समान धोरण आखण्याच्या  नावाखाली बार्टी, महाज्योती, सारथी मार्फत   मोजक्याच  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारने 25 जुलै 2024 रोजी काढला आहे . या शासन आदेशानुसार बार्टी, महाज्योती तसेच सारथी या संस्थांमार्फत  प्रत्येकी केवळ 300 विद्यार्थ्यांनाच संशोधन शिष्यवृत्ती मिळू शकते . या शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांना निम्मीच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे . याचा अर्थ असा की प्रत्येक विद्यार्थाला पूर्वी जाहीर केलेली प्रतिमहिना 34 हजार शिष्यवृत्ती मिळणार नाही, त्याऐवजी केवळ  17 हजार रुपये महिना एवढीच शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे . सरकारनेच पूर्वी जाहीर केलेल्या शिष्यवृत्तीत निम्मी कपात केली जाणे आम्ही कदापिही मान्य करणार नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे .

निम्मीच रक्कम का?

बार्टी, महाज्योतीने प्रारंभी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संशोधन शिष्यवृत्ती दिली आणि रक्कमही पूर्ण दिली . मात्र आता बार्टी, महाज्योती, सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी वेगवेगळ्या अटी घातल्या जात आहेत . विद्यापीठ अनुदान आयोग संशोधक विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती देते . मग आम्हाला शिष्यवृतीची निम्मीच रक्कम देण्याचा राज्य शासनाच्या अट्टाहास का ? असा प्रश्न हे संशोधक विद्यार्थी विचारत आहेत .जणू काही आपल्या स्वतःच्या संपत्तीतूनच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहोत अशा अविर्भात मंत्री  वागत आहेत . त्यामुळे संशोधन शिष्यवृत्तीसाठी संशोधक विद्यार्थ्यांवर अटीवर अटी लादल्या जात आहेत . 

छाननीला विरोध

बार्टी, महाज्योती आणि सारथी च्या यंशोधन शिष्यवृतीसाठी पात्र विद्यार्थांच्या अर्जांची छाननी करण्याचे काम आता या संस्थामार्फत सुरू केले केले जाणार होते . मात्र संशोधक विद्यार्थ्यांनी या निर्णयास तीव्र विरोध दर्शविला आहे . शिष्यवृतीची पूर्ण रक्कम देण्याचा निर्णय झाल्याशिवाय आणि नोंदणी दिनांकापासून शिष्यवृती देण्याचा  निर्णय  झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही या निर्णयावर विद्यार्थी ठाम आहेत .

 शिष्यवृत्तीची वाट पाहणारे विद्यार्थी शासनाच्या या निर्णयामुळे संतापले आहेत .  या निर्णयाच्या विरोधात 5 ऑगस्ट 2024 पासून विद्यार्थ्यांनी पुणे येथे बार्टी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे . गंगाधर दुगाणे  या  विद्यार्थ्याने तर स्वत:वर पेट्रोल ओतून घेत बार्टी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा  प्रयत्न केला . 

राज्य सरकारने मागील दोनअडीच वर्षांपासून चालविलेली क्रूर थट्टा थांबवावी . विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे . मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 16 ऑगस्ट 2024 च्या रात्री याप्रकरणी मी लक्ष घालून प्रश्न सोडविन असे आश्वासन दिले आहे. यावेळी तरी ते सत्यात उतरते का पाहावे लागेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments