विद्यापीठाचा नामविस्तार दिन संपन्न
सोलापूर, दि. 6 – पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावातील ऊर्जेप्रमाणे सोलापूर विद्यापीठाने मोठी उंची गाठावी, अशी अपेक्षा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केली.गुरुवारी,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सहावा नामविस्तार दिनाचा सोहळा 6 मार्च 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त विद्यापीठ कॅम्पसमधून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर मुख्य सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रम व राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. याचे उद्घाटन कुलगुरू प्रा. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर होळकर इतिहास साधन ग्रंथाचे संपादक डॉ. देविदास पोटे, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी अध्यासन केंद्राकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कुलगुरू प्रा. चासकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास पीएमउषा योजनेतून 100 कोटी रुपयांचा निधी मिळाला. यातून विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण होतील. यातून विद्यापीठ नावावररूपाला येईल. विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून वाटचाल करत असताना चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी अध्यापक व प्रशासनाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. संशोधन केंद्रांमधून चांगले संशोधन व संशोधक निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली

.कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सध्या तारुण्यावस्थेत असून शासनाकडून 100 कोटी रुपये निधी मिळाल्याने विद्यापीठाची जडणघडण निश्चितच चांगली होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी प्रत्येक गोष्ट करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आदर्श जीवनशैली, त्यांचे विचार, कार्य हेही विद्यार्थ्यांना कळण्यासाठी अध्यासन केंद्राकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अहिल्यादेवी होळकरांचे लोककल्याणासाठी कार्य खूप मोठे आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठ प्रशासन कार्य करीत राहील. विद्यापीठाकडून विविध संस्था व विद्यापीठे यांच्याशी करार करण्यात येत आहे. यातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी चांगले ज्ञान मिळण्याबरोबरच विद्यापीठ पुढे जाण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. देविदास पोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्वल्य इतिहासाची महती सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनकल्याणाचा वसा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पुढे चालविल्याचे सांगितले. प्रजावत्सल्य, कर्तव्य कठोर प्रशासक, लोक कल्याणकारी लोकमाता राहिलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राज्यकारभार पाहिल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड, स्मारक समितीचे सदस्य प्रा. सुभाष मस्के तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली, डॉ. तेजस्विनी कांबळे, प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले.फोटो ओळी सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सहावा नामविस्तार दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. मनोहर चासकर, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, डॉ. देविदास पोटे, डॉ. प्रभाकर कोळेकर व अन्य.