Monday, November 16, 2026
Homeशिक्षणबातम्याअदानीच्या तारळी प्रकल्पाचे काम बंद करा : वन विभागाचे आदेश

अदानीच्या तारळी प्रकल्पाचे काम बंद करा : वन विभागाचे आदेश

सातारा – महाराष्ट्र वन विभागाने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात तारळी येथे असलेल्या ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’च्या १५०० मेगावॅट क्षमतेच्या ‘ तारळी पंप स्टोरेज प्रोजेक्ट’ चे काम त्वरित थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

वन विभागाच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प ‘नॅशनल बोर्ड फॉर वन्यजीव’ ची पूर्वपरवानगी न घेताच सुरू करण्यात आला होता. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या प्रकल्पाच्या खर्चात ५,६७५ कोटी रुपयांवरून ५६.७५ कोटी रुपयांपर्यंत मोठी कपात करण्याचा प्रस्ताव कंपनीने दिल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर, काही तासांतच वन विभागाने हे आदेश जारी केले.
फेब्रुवारी २०२५ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीनुसार, या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५,६७५ कोटी रुपये होता. मात्र, ८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘अदानी ग्रीन एनर्जी’ने राज्य वन विभागाकडे एक नोटरीकृत शपथपत्र सादर करून, प्रकल्पाचा खर्च ९९ टक्क्यांनी कमी करून ५६.७५ कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव दिला हे वादग्रस्त आहे .

सातारा येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी असे निदर्शनास आणून दिले की, प्रकल्पाच्या मूल्यात केलेली ही कपात थेट अनिवार्य ‘वन्यजीव संवर्धन ठेवी’वर (जी एकूण खर्चाच्या ४% असते) परिणाम करते. यामुळे ही ठेव २२७ कोटी रुपयांवरून थेट सुमारे २.२७ कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे.

अदानी ग्रीन एनर्जीने कायदेशीर देणी टाळण्यासाठी हेतुपुरस्सर खर्च कमी केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ५६.७५ कोटी रुपयांची रक्कम ही केवळ प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरील पाहणी आणि सर्वेक्षणाशी संबंधित होती, ती संपूर्ण ५,६७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाशी संबंधित नव्हती.

या प्रकल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र वन विभागानेही स्वतंत्र चौकशी सुरू केली असून, प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पाणी आणि वनांवर होणाऱ्या परिणामांमुळे चिंतेत असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांनी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाविरुद्ध निदर्शनेही केली आहेत.

…

आ

प

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments