शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक मुलगा जगातील सर्वात भव्य फिल्म सिटी उभारतो, उषाकिरॉन मूव्हीजच्या माध्यमातून प्रसिद्ध तेलुगु चित्रपट निर्माता होतो, प्रिया फूड्स व्दारे लोणचे, मसाले आणि मिठाईचा व्यावसायिक बनतो , बारा भाषांमध्ये टीव्ही चॅनल सुरु करुन पत्रकारांसाठी प्रशिक्षण विद्यापीठ चालवितो, इनाडू वृत्तपत्राचा संस्थापक होतो, मार्गदर्शी ही एक चिट फंड वितरण कंपनी स्थापन करतो, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्सचा मालक बनतो, पद्मविभूषण पुरस्कारास्ह अनेक मानाचे पुरस्कार मिळवितो. ही अतुलनीय, अविश्वसनीय कामगिरी करणारा तो माणूस होता रामोजी राव.
जे काही करायचे ते भव्य – दिव्य करायचे असा ध्यास असलेला हा माणूस 8 जून 2024 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला. चेरुकुरी रामोजी राव असे त्यांचे संपूर्ण नाव. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावातील सधन शेतकरी कुटुंबात झाला. गुडीवाडा म्युनिसिपल हायस्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतले.गुडीवाडा महाविद्यालयातून बीएससी पदवी मिळवली. नंतर त्यांनी दिल्लीत एका जाहिरात एजन्सीसाठी काम करत करिअरला सुरुवात केली.
मार्गदर्शी चिटफंड योजना
जेव्हा चिटफंड म्हणजे काय हे कोणास ठाऊक नव्हते अशा काळात मार्गदर्शी ही एक चिट फंड वितरण कंपनी 1962 मध्ये रामोजी राव यांनी 3,60,000 सभासद एकत्र करून सुरु केली. आंध्र प्रदेशातील अनेक लोकांना फायदा करून त्यांनी फायदा करुन दिला . मार्गदर्शी मध्ये ऑक्टोबर 1962 मध्ये फक्त दोन लोक काम करत , आता आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकात 4,300 कर्मचारी कार्यरत आहेत . याशिवाय,301 एजंट, 108 शाखा, 3,11,146 पेक्षा जास्त सदस्य आहेत. मार्गदर्शी ची सध्याची उलाढाल रु. 10,687 कोटी आहे.
इनाडू वृत्तपत्र
10 ऑगस्ट 1974 रोजी रामोजी राव यांनी तेलुगू दैनिक ‘ईनाडू’ ची विशाखापट्टणममध्ये सुरुवात केली. वृत्तपत्राने झटपट लोकप्रियता मिळवली आणि चार वर्षांत ते अग्रगण्य प्रकाशन बनले. राज्यातील पाच वाचकांपैकी दोन वाचक इनाडू वाचतात हे ते अभिमानाने सांगत असत. इनाडू वृत्तपत्रामुळे त्यांचा माध्यम क्षेत्राात प्रवेश झाला. पैसा, प्रसिध्दी, प्रतिष्ठा याचा लाभ झाला. आंध्र प्रदेश , तेलंगणातील ते महत्वाचे व्यक्ती बनले. नंतरची 50 वर्षे रामोजी राव समृध्द जीवन जगले. अनेक संकटांचा सामना त्यांनी केला, सत्ताधा-यांच्या धमक्या आणि छ्ळालाही ते कधी घाबरले नाहीत. त्यांना जे कार्य करायचे होते ते कार्य ते अखंडितपणे करीत राहीले.
रामोजी फिल्म सिटी जगातील आठवे आश्चर्य
नवी, भव्य स्वप्ने पाहणे व ती प्रत्यक्षात साकार करणे हे रामोजी राव यांच्या स्वभावाचे वैशिष्टय होते. जीवनाच्या अखेरीपर्यंत नवे काही तरी निर्माण करण्याची जिद्द त्यांच्या मनात कायम होती. 1996 मध्ये रामोजी राव यांनी हैदराबादजवळ रामोजी फिल्म सिटीची स्थापना केली. 1696 एकरांवर पसरलेल्या रामोजी फिल्म सिटीची जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. चित्रपट निर्मात्याने केवळ चित्रपटाची कथा घेऊन येथे यावे आणि चित्रपट बनवूनच बाहेर पडावे अशी त्यांची संकल्पना होती. त्या काळात 100 कोटी खर्च करुन त्यांनी ही फिल्म सिटी बनविली. यात वृंदावन गार्डन, राजस्थान पॅलेस, लंडन स्ट्रीट, जपानी गार्डन, विमानतळ, जेल, रेल्वे स्टेशन असे कायम सेट आहेत. बाहुबलीसह अनेक चित्रपटांची चित्रीकरण येथे आहे. देश – विदेशातील पर्यटक रामोजी फिल्म सिटी पाहण्यासाठी ्वर्षभर गर्दी करीत असतात. यात हॉटेल्स आहेत, पक्षी संग्रहालय आहे, पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक शो आहेत, कार्निवल आहे. पर्यटकांना आतल्या आत फिरता यावे यासाठी विविध वाहनांची सोय आहे.
दरवर्षी 15 लाख पर्यटक
रामोजी फिल्म सिटीत 1200 कामगार आणि 1800 एजंट काम करतात. दरवर्षी विविध भाषेतील 450 पेक्षा अधिक चित्रपट येथे चित्रित होतात. दरवर्षी अंदाजे 15 लाख पर्यटक रामोजी फिल्म सिटीला भेट देतात. आताच्या तेलंगना राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यात आणि राज्याला पर्यटनाव्दारे मोठे उत्पन्न मिळवून देण्यात रामोजी फिल्म सिटीचा वाटा मोठा आहे.
ई टीव्ही नेटवर्क
रामोजी राव यांनी 1995 मध्ये ई टीव्ही नेटवर्क चॅनेल अंतर्गत 12 चॅनेलचा समूह सुरू केला आणि विविध भाषांमध्ये बातम्या, मनोरंजन , माहिती प्रसारित केली. ई टीव्ही चॅनेल तेलुगु, हिंदी, बांगला, मराठी, कन्नड, उडिया, गुजराती आणि उर्दू भाषेतील दैनिक टीव्ही मालिका, टीव्ही शो प्रसारित करणारे लोकप्रिय चॅनेल आहे. चॅनेलने अन्नदाता नावाचा मॉर्निंग शो प्रसारित करण्यास सुरुवात केली, ज्यात शेतकऱ्यांचे जीवन, विविध क्षेत्रांतील लागवडीच्या पद्धती यांचं चित्रण होतं. हा पहिला टीव्ही शो होता जो शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू झाला आणि त्या काळात सर्वाधिक टीआरपी मिळवला. ई टीव्ही भारत च्या माद्य्मातून अजूनही गुणवत्ता, अभिरुची जपण्याचे कार्य करते. देशभरातील पत्रकारांसाठी हे प्रशिक्षण विद्यापीठ आहे. जात -पात, वशिला , पैसा काही न देता केवळ गुणवत्ता या निकषावर येथे विविध भाषेतील हजारो पत्रकार प्रारंभीच्या काळात येथे येतात, नोकरी करतात, प्रशिक्षित होतात आणि मग देशभरात विविध माध्यमात मोठ्या पदावर कार्य करीत आहेत. रामोजी राव या सर्व पत्रकारांसाठी आदर्श आहेत.
प्रिया फूडस
रामोजी राव यांनी 1980 मध्ये प्रिया फूड्सची सुरुवात करुन ानेकांना रोजगार दिला. लोणची, मसाले, खाद्यतेल आणि इतर मिठाई लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरुवात केली. 25 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्सचे ते मालक देखील आहेत. रामोजी फिल्म सिटी आणि विशाखापट्टणममध्ये हॉस्पिटॅलिटीच्या सर्व गरजा ही हॉटेल्स पूर्ण करतात.
आपली पत्नी रामदेवी यांच्या नावे रामोजी फिल्म सिटीच्या प्रवेशव्दारानजीक रमादेवी पब्लिक स्कूल नावाची नामांकित शैक्षणिक संस्था रामोजी राव यांनी उभारली आहे.
आयुष्यभर पांढरा पोषाख, पांढरे बूट अशी साधी राहणी, उच्च विचारसरणी हे रामोजी राव यांचे वैशिष्टय होते. अनेकांच्या आयुष्याला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. एकच माणूस लोणची मसाल्यापासून, वृतपत्रे , बँकिंग , हॉटेलिंग चॅनल्स, चित्रपट निर्मिेतीच्या , फिल्म सिटी, बंकिंग, हॉटेलिंग इयादी क्षेत्रात कार्यकरुन राज्याच्याच नव्हे तर देशाच्या अर्थकारणालाही गती देतो हे अदभूत आहे. हे महान कार्य करणा-या रामोजी राव यांना अखेरचा सलाम.