थिरुवनंतपुरम – केरळ सरकारने तेथील प्राथमिक शाळांमध्ये लिंगभाव समानतेचा संदेश देणारी पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमात लागू केली आहेत . घरातील कामे फक्त स्त्रीचे अथवा पुरुषाचे एकट्याची नाही तर सर्व कामे प्रत्येकाची समान जबाबदारी आहे असा संदेश यातून देण्यात आलेला आहे .
10 जून 2024 पासून केरळमधील शाळांच्या सुट्या संपवून विदयार्थी शाळेत आले तेव्हा विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत .या पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक चित्रे असून त्यामध्ये वडील स्वयंपाक घरात आईसमवेत कामे करताना दिसून येतात .यातील वडील नारळ खोवताना किंवा फराळ बनविताना दिसतात . घरातील कामे फक्त स्त्रीनेच करायची ही पारंपरिक समजून चुकीची असून घरातील सर्व कामे करणे ही आई आणि वडील यांची एकत्रित जबाबदारी आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे . ‘
पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावर देखील कार चालवणाऱ्या पुरुषाला महिला वाहतूक पोलीस शिस्तीचे धडे देताना दिसत आहे . शिक्षकांशी संवाद साधतानाही लिंगभाव समता जोपासण्यास सांगण्यात आले आहे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना फक्त शिक्षक (टीचर)असेच म्हणायचे सर अथवा मॅडम असे म्हणायचे नाही असा नियम केरळ सरकारने केला आहे .सर्व शाळांमध्ये एकत्रित शिक्षण असावे, मुलांसाठी वेगळी शाळा आणि मुलींसाठी वेगळी शाळा असू नये देखील सरकारने स्पष्ट केले आहे .
शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणारे गणवेश हे देखील लिंगभाव समानतेचा संदेश असावेत असे सांगण्यात आले आहे .त्यानुसार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी शर्ट आणि पॅन्ट असा समान पोशाख देण्यात आलेला आहे .शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनात नकळत लिंगभाव समानतेचे संस्कार यासाठी केरळ सरकारने हा पुढाकार घेतल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले .विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या पुस्तकांचे आणि पोशाखाचे चांगले स्वागत केले आहे . पालकांनी देखील या मोहिमेला चांगला पाठिंबा दिला आहे . लिंगभाव समतेसाठी पुढाकार घेणारे केरळ हे देशातील एकमेव राज्य आहे.