हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार (Imd) पुढील 5 दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 3 ते 5 मे दरम्यान मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
India Weather News : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. देशातील बहुतांश ठिकाणी उष्णता (Heat) वाढली आहे. तापमानाचा पारा वाढल्यामुळं नागरिकांची काहीली होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार (Imd) पुढील 5 दिवसांत महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातमध्ये 3 ते 5 मे दरम्यान मध्य भारतात उष्णतेची लाट ( Heat Wave) येण्याची शक्यता आहे. तर रात्रीही उकाड्याचा आणि उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिलाय.
गंगेच्या खोऱ्यात तापमानाचा पारा वाढणार
गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, उत्तर ओडिशा आणि रायलसीमा येथे 3 मे पर्यंत कमाल तापमान 44 ते 47°C च्या आसपास राहण्याची आणि त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे. गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी; ओडिशा, बिहारचा काही भाग; आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, झारखंडच्या तुरळक भागात उष्णतेच्या लाटेची किंवा उष्णतेच्या तीव्र लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांत या प्रदेशातील तुरळक भागात उष्णतेच्या लाटेच्या स्थितीसह तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.
तेलंगणा, कर्नाटक मध्यवर्ती भाग, आंध्र प्रदेशमध्ये उष्णता वाढणार
पुढील 3 दिवसात रायलसीमाच्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेच्या लाटेची ( Heat Wave) स्थिती आणि त्यानंतरच्या 2 दिवसांत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत तेलंगणा, कर्नाटकातील मध्यवर्ती भाग, किनारी आंध्र प्रदेश आणि याणम मधील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तामिळनाडू मधील तुरळक भागात उष्णतेच्या लाटेची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रात 3 ते 5 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात राज्यातील तुरळक भागात 5 मे पर्यंत आणि मराठवाड्यातील तुरळक भागात 3 ते 5 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवस कर्नाटक आणि केरळ आणि माहे किनारपट्टीसह पश्चिम आसाममध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर 3 ते 5 मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 1 आणि 2 मे 2024 रोजी ओडिशा आणि गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्ये रात्री उकाड्याची शक्यता आहे. दरम्यान, या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.