धाराशिव- लेखक शाहू पाटोळे यांनी लिहिलेल्या ‘ कडूसं ‘ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता धाराशिव येथील रा. प. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

मीरा प्रकाशन छत्रपती संभाजीनगरतर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेतर्फे या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. ए.डी. जाधव राहणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील पुरातत्वशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. माया पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी डॉ. रवींद्र चिंचोलकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.
शाहू पाटोळे यांनी मागील 30 वर्षाच्या कालखंडामध्ये विविध वृत्तपत्रांमध्ये, नियतकालिकात लिहिलेल्या लेखांचा ‘कडूसं’ हा संग्रह आहे . या पुस्तकाची पाठराखण पत्रकार जयदेव डोळे यांनी केली आहे .
मराठवाडयातील आणि विशेषतः धाराशिव जिल्हयातील ग्रामीण भागातील गावकुसाबाहेरच्या लोकांची खाद्य संस्कृती, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात येणाऱ्या अडचणी, बदलते समाज जीवन, न सुटणारे सामाजिक प्रश्न इत्यादी विषयांचा धांडोळा या लेखातून घेण्यात आला आहे .
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद धाराशिव शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, सचिव माधव इंगळे, कोषाध्यक्ष बालाजी तांबे इत्यादींनी केले आहे .