Monday, October 7, 2024
Homeशिक्षणबातम्यानायडूंच्या हाती ‘ लाडू ‘

नायडूंच्या हाती ‘ लाडू ‘

तिरूपती देवस्थानाकडे लाडूसाठी पुरवल्या जाणाऱ्या तुपाची गुणवता तपासण्यास  यंत्रणा नाही त्यामुळे पुरवठादारांचे फावले असे तिरुपती मंदिराच्या कार्यकारी अधिकारी श्यामला राव म्हणतात. तीन लाख कोटी रुपये एवढी अवाढव्य संपत्ती असलेल्या भारतातील सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थानासाठी तुपाची गुणवत्ता तपासणे खरेच इतके अवघड आहे का? रवींद्र चिंचोलकर यांचा लेख .

तिरूपती देवस्थान हे इ .स . 900 साली  निर्माण केले गेलेले मंदिर आहे. महाराष्ट्रातील लोक त्याला तिरुपती बालाजी म्हणून ओळखतात . 1930 पासून या मंदिराचा कारभार कायदयाने स्थापन केलेल्या तिरुमला तिरूपती देवस्थानम ( टीटीडी ) ट्रस्टमार्फत चालतो . हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे . याची एकंदर मालमत्ता तीन लाख कोटी रुपये आहे . भारतातील 26 राज्यांच्या बजेटपेक्षा ही संपत्ती अधिक आहे. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी 16 हजार कर्मचारी नेमलेले आहेत .

 लाडूला जी.आय. टॅग 

तिरुपती  मंदिराचे लाडू जगप्रसिद्ध आहेत .इ.स. 1715 पासूनया मंदिरात लाडूचा प्रसाद वाटला जातो.  या लाडूला 2014 साली भौगोलिक नामांकन (जी.आय. टॅग ) मिळालेले आहे .मंदिरात 620 वैष्णव ब्राह्मण आचारी लाडू वळण्याचे काम करतात . दररोज 500 लिटर गाईच्या तुपाचा वापर करून दररोज पाच लाख लाडू तयार केले जातात .या लाडूत काजू , बेदाणे मोठ्या प्रमाणात असतात.  मोठ्या आकाराचा एक लाडू सध्या 75 रुपयांना विकला जातो . वर्षभरात 6 लाख लिटर गाईच्या तुपाचा वापर करून 18 कोटी लाडू तयार केले जातात. लाडूतून देवस्थानाला दरवर्षी  500 कोटी रुपये मिळतात. 

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे .विद्यमान मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे राजकारणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांच्या सरकारबाबत जनतेत असलेला राग दुसरीकडे वळविण्यासाठी ते  मंदिराचा वापर  करीत आहेत .माझ्यावर आणि  आमच्या पक्षावर खोटे आरोप करीत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे . वायएसआर कॉंग्रेस पार्टीने कोर्टातही धाव घेतली असून माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची केली जाणारी बदनामी थांबवावी अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा आरोप

 तिरुपती देवस्थानचा प्रसाद असलेल्या या जगप्रसिद्ध लाडूच्या संदर्भात मोठा विवाद सध्या सुरू झालेला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू 18 सटेंबर 2024 रोजी एनडीए कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आरोप केला की   ‘’वायएसआर काँग्रेस पार्टीचे जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री होते, त्या काळात तिरूपती मंदिरात बनविल्या जाणाऱ्या लाडूसाठी पुरविण्यात आलेल्या तुपात  प्राण्यांची चरबी आणि माशाचे तेल मिसळले जात होते. आमचे सरकार येताच हा प्रकार थांबवून आम्ही  गाईचे शुद्ध तूप वापरू लागलो आहोत’’ . चंद्राबाबूंच्या तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रवक्ते अनम व्यंकटरामन रेड्डी यांनी लगेच 19 सप्टेंबर 2024 रोजी पत्रकार परिषद घेऊन गुजरातमधील लॅबने तुपाची तपासणी करून दिलेला अहवालाची प्रतच पत्रकारांना दिली .या अहवालानुसार मंदिराला पुरवल्या जाणाऱ्या तुपामध्ये गाय , म्हैस या प्राण्यांची चरबी ,डुकराची चरबी , माशांचे तेल याची भेसळ केली जात होती असे दिसते . साहजिकच या आरोपामुळे देश ढवळून निघाला आहे . याच मंदिरातून राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेस मोठ्या प्रमाणात लाडू पाठविण्यात आले होते. मंदिरात दररोज येणारे सरासरी 60 हजरापेक्षा अधिक भाविक श्रध्देने हा लाडू सेवन करतात, प्रसाद म्हणून घरी नेऊन वाटतात. 

रेड्डी यांच्याकडून आरोपांचा इन्कार 

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री नायडू यांच्या आरोपांचा इन्कार केला आहे . ते म्हणतात ” मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठी नायडू कोणत्याही थराला जाऊ शकतात . या प्रकरणात नायडू मंदिराचा वापर करून घेत आहेत . याप्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे “.जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणात रेड्डी यांची होणारी बदनामी थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे .

या संपूर्ण  प्रकरणात मे 2024 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. 

  मे 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आंध्र प्रदेश विधानसभेतील बलाबल. 

भाजप व सहकारी पक्ष ( एन.डी.ए.)विधानसभेतील आमदारविरोधी पक्ष विधानसभेतील आमदार
तेलगु देसम पार्टी135वायएसआर कॉंग्रेस पार्टी 11
युवा सेना पार्टी 21कॉंग्रेस व सहकारी पक्ष ( इंडिया आघाडी )00
भारतीय जनता पार्टी 08—–
एकूण 164एकूण 11

वायएसआर कॉंग्रेसचे संस्थापक जगन मोहन रेड्डी  यांनी काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन केला . 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळून ते मुख्यमंत्री झाले होते. आता चित्र अगदी उलट आहे. या निवडणुकीत वायएसआर कॉंग्रेस पार्टीची सत्ता घालवून एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले. तेलगु देसमचे पार्टीचे  नेते चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री बनले. 

अश्लील चित्रफितींचे प्रकरण 

अलिकडेच आंध्र प्रदेशातील एका कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावून शेकडो मुलींचे अश्लील  व्हिडिओ सोशल मिडियावर टाकले गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या निमित्ताने चंद्राबाबू  सरकारला घेरण्याचा प्रयत्न . जगन मोहन रेड्डी आणि त्यांच्या पक्षाने केला. त्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू यांच्या हाती लाडूचे प्रकरण जाहीर केले. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ख्रिश्चन धर्माचे आहेत, त्यामुळे हिंदू धर्माच्या  अस्मितेला त्यांनी हात घातल्याचे सांगून त्यांना जगन मोहन रेड्डी यांना आणखी बदनाम करणे हे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांच्यासाठी मोठ्या फायद्याचे आहे. 

नंदिनी मार्फतच तुपाचा पुरवठा 

तिरुपती मंदिराला लाडू बनविण्यास लागणारे तूप पुरवण्यासाठी मंदिर समिती ( टीटीडी) टेंडर मागवते. यात कमी रकमेचे टेंडर ज्यांचे  असेल त्या कंपनीला टेंडर मिळते.मंदिराला प्रत्येक महिन्यात लागणारे दीड हजर लीटर गाईचे तूप पुरविण्याची क्षमता भारतात गुजरातमधील ‘अमूल’ , कर्नाटकातील ‘नंदिनी’ आणि तामिळनाडूतील ‘अविन’ या तीनच कंपन्यांकडे आहे. मागील जवळपास चाळीस वर्षे कर्नाटक मिल्क फेडरेशन या कर्नाटक सरकारच्या कंपनीच्या  ‘नंदिनी’ या ब्रँडच्या तुपाचा पुरवठा तिरुपती मंदिराला होत होता. 2023 मध्ये जगन मोहन रेड्डी यांचे सरकार सत्तेवर असताना, मंदिर ट्रस्टने मागविलेल्या टेंडर प्रक्रीयेत नंदिनी कंपनीचा सहभाग नव्हता . तुपाचे दर वाढलेले असल्याने मंदिर ट्रस्टला अपेक्षितअसलेल्या कमी  किमतीत आम्ही तूप पुरवू शकत नाही असे नंदिनी कंपनीचे म्हणणे होते. अखेर मंदिर ट्रस्टने पाच वेगवेगळ्या कंपन्यांना  320 रुपये प्रतीकिलो या दराने तूप पुरवण्याचे कंत्राट दिले होते, त्यात अमूलचाही वाटा होता.तूप पुरविणा-या  पाच कंपन्यांपैकी ए. आर. डेअरी या कंपनीबाबत सर्वाधिक तक्रारी होत्या .मंदिर ट्रस्टने या कंपनीला योग्य दर्जाचा तुपाचा पुरवठा करा असे बजावले ,  तसेच चार ट्रक तूप योग्य दर्जाचे नाही म्हणून परत पाठविले. नंतर या ए.आर. डेअरीला काळ्यायादीत टाकण्यात्त आले. 

तुपाच्या गुणवत्तेची तपासणी 

दरम्यान विधानसभा निवडणुका होऊन मे 2024 मध्ये चंद्रबाबू नायडूंचे सरकर आले . या नव्या सरकारने लाडूतील तुपाची गुणवत्ता तपसण्यास नमुने  गुजरातेतील प्रयोगशाळेत पाठविले.  या प्रयोगशाळेने 23 जून 2024 रोजी अहवाल देवून तुपात भेसळ असल्याचे स्पष्ट केले. सप्टंबर 2024 रोजी मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी एका भाषणात हा अहवाल सांगितला. आम्ही हा प्रकार थांबविला असून आता लाडूसाठी गाईचे शुध्द तूप वापरले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. नंदिनीला कंपनीला पुन्हा तूप पुरविण्यास सांगण्यात आले . आधीच्या 320 दराऐवजी  नंदिनी कंपनीला 475 रुपये प्रतिलिटर असा दर देण्यात आला आहे. 

यावर ए.आर. डेअरीचे म्हणणे असे आहे की आम्ही फक्त जून आणि जुलै 2024 या दोन महिन्यात मंदिराला तुपाचा पुरवठा केला होता तो पुरवठा शुद्ध तुपाचा होता.आजही बाजारात सर्वत्र  आमचे तूप उपलब्ध आहे, कुठेही त्याची गुणवत्ता तपासली जाण्यास आमची तयारी आहे .

मंदिराच्या तुपाच्या आडून आपला अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करीत आहे.  केंद्र सरकारनेही याची दखल घेतली असून केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांनी हे प्रकरण गंभीर असून आम्ही यात लक्ष घालू असे म्हटले आहे. 

मंदिर रक्षण मंडळ 

तुपाच्या या वादाच्या निमिताने आंध्र प्रदेशचे उप मुख्यमंत्री आणि युवा सेना पार्टीचे प्रमुख पवन कल्याण यांनी वेगळीच मागणी केली आहे .मंदिराबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी देशस्तरावर सनातन धर्म रक्षण मंडळाची स्थापना करावी अशी त्यांची मागणी आहे . केली आहे .देशातील मंदिरांचे व्यवस्थापन  सरकारच्या ताब्यात नको आमच्या ताब्यात द्या अशी  मोहीम चालवणाऱ्या कर्मठ लोकांच्या मागणीला बळ देणारी ही मागणी आहे . एक नवे सत्ता केंद्र निर्माण करण्याचा डाव यामागे आहे .

फाशी देण्याची मागणी 

शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती यांनी तर माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना फासावर चढवावे अशी मागणी केली आहे.

काही अनुत्तरित प्रश्न
  • भारतात सर्वात श्रीमंत असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानाकडे तुपाची गुणवत्ता तपासण्याची सक्षम यंत्रणा का नाही ?
  • जर गुणवत्ता तपासण्याची नाही तर कमी गुनवत्तेचे म्हणून ए.आर. डेअरीचे चार ट्रक तूप कोणत्या निकषावर परत पाठविले. एका कंपनीला काळ्या यादीत कसे टाकले?
  •   मंदिराचे सर्व 24 ट्रस्टी हिंदू असताना, लाडू वळणारे 620 आचारी वैष्णव ब्राम्हण असताना हे कसे घडले? 
  • तुपाच्या गुणवत्तेबाबत 2015 सालीही तक्रारी आल्या नव्हत्या कां? तेव्हा सत्तेवर कोण होते? त्यावेळी मुख्यंत्र्यांना दोषी धरले का?
  • जर जुलै 2024 मध्येच दोन महिन्यापूर्वीच लाडूच्या तुपात भेसळ असल्याचा अहवाल हाती आला मग मुख्यमंत्री नायडू  दोन महिने गप्प का बसले ?
  • मंदिराचा संपूर्ण कारभार तिरुमला मंदिर ट्रस्टकडे आहे,  मग तूप पुरवठ्याचे कंत्राट देण्याचा ठपका माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर का?
  • बाजारात गाईचे तूप 700 रुपये  लिटरने मिळत असताना तिरुमला देवस्थान ट्रस्टने  320 रुपये किलोने गाईचे शुद्ध तूप मिळेल यावर विश्वास कसा ठेवला?
  • सत्तेवर असूनही मुख्यमंत्री नायडूंना जगन मोहन रेड्डी यांची भीती का वाटते  ?माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ख्रिश्चन धर्माचे पालन करतात म्हणून हे सारे सुरु आहे का?
  • देशातील मंदिरांचे व्यवस्थापन सरकारच्या हातातून काढून घेऊन सनातनींच्या हवाली  करन्याचा  छुपा अजेंडा यामागे आहे का?

या प्रकरणाची  न्यायालयीन चौकशी होणे आणि सत्य शोधून काढले जाणे आवश्यक आहे. जर यात सर्वात मोठा दोेष कोणाचा असेल तर तो ट्रस्टींचा आहे , त्यांना शोधून शासन केले गेले पाहिजे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments