नवी दिल्ली – ‘दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशन’ने ‘इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम’च्या (इंधनात इथेनॉल मिसळण्याच्या योजनेच्या) अंमलबजावणीविरोधात ४ ऑगस्ट रोजी संसदेवर निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट म्हणाले, “E20 इंधनाचा वापर सुरू झाल्यानंतर देशाच्या विविध भागांतील वाहनचालक आणि वाहनमालकांनी इंधनाची कार्यक्षमता कमी होणे, देखभालीचा खर्च वाढणे आणि इंजिनच्या कामगिरीबाबत चिंता वाटणे अशा समस्या नोंदवल्या आहेत. २०१५ पूर्वी तयार केलेली अनेक वाहने E20 साठी डिझाइन केलेली नाहीत. हे इंधन प्रामुख्याने नवीन मॉडेल्सच्या वाहनांसाठी योग्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “जेव्हा लोक पेट्रोलसाठी पैसे मोजतात आणि सरकार इंधनाचे दर वाढवते, तेव्हा आम्हाला इथेनॉलमिश्रित पेट्रोल का दिले जात आहे? नियमन आणि कामकाजातील आव्हानांमुळे आम्हाला वाढत्या आर्थिक तणावाचा सामना करावा लागत आहे…”
असोसिएशनने सांगितले की, या निषेध मोर्चाद्वारे ते इथेनॉल ब्लेंडिंग धोरणाचा स्वतंत्र वैज्ञानिक आढावा घेण्याची मागणी करतील; ज्यामध्ये वाहनमालक, ग्राहक, वाहतूकदार, वाहन उत्पादक आणि तांत्रिक तज्ज्ञ यांचा समावेश असावा.
सम्राट म्हणाले, “आम्ही निषेध नोंदवू आणि संसदेवर मोर्चा काढू. हे आंदोलन शांततापूर्ण असेल आणि त्यात कोणताही राजकीय हेतू नसेल, कारण आमची संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेली नाही. आम्ही केवळ व्यावसायिक वाहने वापरणाऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या मांडणार आहोत आणि केंद्र व राज्य सरकारला सर्व संबंधित घटकांशी (स्टेकहोल्डर्सशी) विधायक चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आवाहन करणार आहोत.”

