Thursday, October 3, 2024
Homeअर्थकारणफसवण्याचा आमचा धंदा

फसवण्याचा आमचा धंदा

दररोज भारतीयांना किमान 500 कोटींना गंडा घालणारे सायबर दरोडेखोर कधीच सापडत नाहीत, बहुतेकांचे पैसे परत मिळत नाहीत. दररोज अशा फसवणुकीच्या सात हजार तक्रारी नव्याने दाखल होतात. घरात असूनही आपण सुरक्षित नाही, अशी बिकट स्थिती आहे. वाचा रवींद्र चिंचोलकर यांचा लेख

छान लोकवस्तीत , मोठी सुरक्षा असलेल्या अपार्टमेंट मध्ये तुम्ही राहत असाल . तुम्ही  तुमच्या फ्लॅटला सुरक्षेसाठी लोखंडी दरवाजे बनविले असतील, दरवाजाला  भारीची कुलुपे लावलेली असतील . आपण सुरक्षित आहोत असे तुम्ही समजत असाल, तर तो तुमचा भ्रम आहे .घरात बसल्या – बसल्या तुम्ही केव्हा आणि कसे गंडविले जाल ते सांगता येणार नाही . तुमची आयुष्यभराची पूंजी क्षणात गायब होऊ शकते .

बर्बाद गुलिस्ताँ करने को 

बस एक ही उल्लू काफ़ी था

हर शाख़ पे उल्लू बैठा है 

अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा ।

अशी आपली आजची अवस्था आहे . नव – नव्या युक्ती शोधून आपणाला ऑनलाईन गंडविण्यास लाखो टोळ्या देशात परदेशात कार्यरत आहेत . दिवसा – रात्री एक क्षणही आपण बेसावध राहिलो, आमिषाला भुललो तर आपली फसवणूक अटळ आहे .

सावध राहण्यासाठी मला आणि माझ्या परिचितांना आलेले  काही अनुभव येथे सांगत आहे .

प्रसंग एक – मै शर्माजी बोल रहा हूं

काही दिवसांपूर्वी मी  प्रवासात असताना अचानक फोन आला .

‘हॅलो रवींदरजी कैसे हो, पहचाना मुझे’?.

 मी विचार करू लागलो तोवर तो पुढे म्हणाला

 ‘ मै शर्मा बोल रहा हूँ”.

 दिल्लीतील दोन -तीन शर्मा ओळखीचे आहेत, त्यापैकी हा कोणी असावा याचा मी विचार करत होतो . मला विचार करायला उसंत न देता तो म्हणाला’ ‘

रविंदरजी एक मुसिबत मे फँस गया हूँ, आपही मेरी सहायता कर सकते हो. नाशिक की एक फर्म मे मेरा पेमेंट अटक गया है, मेरे फोन पर पैसा ट्रान्स्फर नही हो रहा; आपके फोनपर 40 हजार रुपये ट्रान्सफर करने को उनको बोला है ।”. 

मी त्याला म्हणत होतो, “मी नाही काही मदत करू शकणार, मी प्रवासात आहे आणि माझ्याकडे पैसे का पाठवता ?”.

 हे सांगेपर्यंत  फोनपेद्वारे  40 हजार पाठविल्याचा संदेश मला आला. तो शर्मा म्हणाला

 “रवींदरजी आप पर मेरा पूरा भरोसा है, देखो 40 हजार आपको ट्रान्स्फर हुआ है । मुझे हॉस्पिटल का बिल अर्जंट पेड करना है, मै आपको हॉस्पिटलका नंबर देता हूँ । उसपर तुरंत 5 हजार रुपये भेज देना ।”

तो मला विचार करायला वेळच मिळू देत नव्हता . तरीही मी माझ्या मुलाला फोन करून शर्माचा आणि त्याने दिलेला दुसरा मोबाईल क्रमांक तपासण्यास सांगितले . मुलगा म्हणाला ‘’एका नंबरवर दुसरेच नाव येत आहे , दुसऱ्यावर काहीच नाव येत नाही . फसवणुकीचा प्रकार दिसतोय, तुम्ही बँक अकाउंट चेक करा, पैसे जमा झालेले नसतील “.

मी बँक अकाउंट तपासले, खरेच त्यात एकही रुपया जमा झालेला नव्हता . शर्माचे सतत फोन येत होते . शेवटी त्याला मी सांगितले मला पैसे आलेले नाहीत, हा सारा फसवणुकीचा प्रकार आहे. मी काहीही मदत करणार नाही ‘.

त्यावर त्या तथाकथित शर्माने ‘ठीक है मे देखता हूँ’ असे म्हणत फोन बंद केला .तो मोबाईल क्रमांक मी लगेच ब्लॉक केला . मी वाचलो पण हा किसा सांगताच आमची कामवाली बाई म्हणाली , पंधरा दिवसापूर्वी माझी अशीच 14 हजाराची फसवणूक झाली. 

तात्पर्य – घाईत निर्णय घेऊ नका .

प्रसंग दोन – वीज मंडळाच्या नावाने फसवणूक 

पुण्यातील उच्चभ्रूंची एक सोसायटी . सोसायटीतील महिलांनी त्यांचा खास व्हाटसअप ग्रुप बनविला. जवळपस 60 महिला सदस्य होत्या. अधून – मधून  मिळून पर्यटनाला जाने, रिल्स बनविणे अशा गमती – जमती सुरु होत्या. एके दिवशी त्यातील एका भगिनीच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने फोन उचलताच  वीज मंडळातून बोलत आहे, तुमची वीज आज रात्री 9 वाजता जाणार आहे असे सांगितले. खरोखर रात्री 9 वाजता वीज गेली. पुन्हा त्या भगिनीच्या मोबाईलची रिंग वाजली , पुन्हा तोच आवाज. वीज मंडळाने केव्हा वीज जाणार हे नागरिकांना कळण्यास एक विशेष  वेळापत्रक तयार केले आहे. तुम्हाला आम्ही एक लिंक पाठवितो ,ती डाउनलोड करा असे सांगण्यात आले.  त्या भगिनीने लिंक डाऊनलोड केली आणि तसे कळविले . त्या व्यक्तीने सांगितले आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो मला सांगा . मोबाईलवर आलेला ओटीपी त्या महिलेने त्याला सांगताच तिच्या बँक खात्यातले 56 हजार गायब झाले. महिलांचा तो व्हॉटसअप ग्रुपच हॅक झाला. सर्वांच्या मोबाईलवर अश्लील मेसेज , व्हिडिओ येऊ लागले. तातडीने रात्री एक वाजता सर्व भगिनींना एकत्र बोलावले. तो व्हाटसअप्‍ ग्रुप डिलीट केला, तेव्हा हा प्रकार थांबला. 

तात्पर्य – अनोळखी लिंक वर क्लिक करू नका

प्रसंग तीन – सायबर तज्ञाला  कोटीचा गंडा

जळगाव येथील  साेनल भीमराव उपलपवार या एका महाविद्यालयात सायबर‎अवेअरनेस हा विषय शिकवतात. शेअरबाजारात अधिक फायदा मिळण्यासाठी त्यांना फेब्रुवारी 2024 मध्ये  व्हाॅटसअप वरील  D-GS-VIP 4 या विशेष   ‎ग्रुपवर जाेडण्यात आले.  शेअर्समध्ये त्यांना. एका आठवड्यात अकरा लाखाचा फायदा झाला असे सुरुवातीला दर्शविण्यात आले. सोनल यांनी 11 लाख रुपये क्रिप्टो करन्सीव्दारे काढले. त्यामुुळे सोनल्‍ यांचा विश्वास बसला . 35  दिवसात त्यांची 1 कोटी 35 लाख रुापयांची फसवणूक झाली.

तात्पर्य – फसवणारे फार पोहोचलेले आहेत, मोह टाळा .

प्रसंग चार – केबीसीच्या नावे फसवणूक 

ही घटना याच आठवड्यात  सप्टेंबर 2024 मध्ये हिमाचल प्रदेशमधील अमीरपूर गावात घडली आहे.   येथे एका तरुणाला फेसबुकवर केबीसीची लिंक सापडली होती.  या लिंकवरील प्रश्नांची उत्तरे त्याने दिली. त्याला संदेश आला की  तुम्हाला  नेक्सॉन कार बक्षीसामध्ये प्राप्त झाली आहे. कार मिळण्यासाठी  टप्प्या –  टप्प्याने त्याची 11 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.   

तात्पर्य – सावध रहा फसवणारा कोणत्याही मार्गाने येऊ शकतो .

प्रसंग पाच -होस्टेल गायब 

परराज्यात राहणा-या  एका मुलीला पुणे येथे नोकरी लागली. ती माझ्या मुलीची मैत्रीण होती. तिला पुण्याची काहीच माहिती नव्हती. उत्साहाच्या भरात तिने ऑनलाईन तपास केला, तिच्या ऑफिसच्या जवळच एक गर्ल्स होस्टेल  दिसले. तिने दिलेल्या मोबाईल नंबरवर बुकींग करुन एकंदर 14 हजार रुपये भरले. ज्या दिवशी तिला पुण्यात पोहोचायचे होते त्याच्या एक दिवस  आधी तिने बुकींग केलेल्या होस्टेलला फोन केला. मात्र फोन उचलला जात नव्हता. तिने माझ्या मुलीला हे सांगितले. आम्ही दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन पाहिले, आजूबाजूला चौकशी केली. त्या भागात त्या नावाचे गर्ल्स होस्टेलच नव्हते. आम्ही त्या मुलीला कळविले , तुला फसविले आहे. तिला नव्याने सर्व व्यवस्था करावी लागली. 

तात्पर्य – खात्री झाल्याशिवाय पैशाचे व्यवहार करू नका .

प्रसंग सहा – घरबसल्या कमवा 

 माझ्या विद्यार्थिनीने मोबाईलवर एक जाहिरात पाहिली. ‘घरबसल्या महिन्याला कमवा पंधरा ते तीस हजार रुपये’ अशी जाहिरात पाहिली. मुलगी अगदी गरीब कुटुंबातील होेती. तिने जाहिरातीतील क्रमांकावर फोन केला. त्यांनी सांगितले काम सोपे आहे, आम्ही तुम्हाला शिसपेन्सिल पाठवू . त्या फक्त दिलेल्या बॉक्समध्ये  प्रत्येकी दहाप्रमाणे टाकून बॉक्स पॅक करायचा आहे. काम सोपे होते, तिने काम करण्यास होकार कळवला. मग माल पाठविण्यासाठी नाव, गाव, पत्ता , आधारकार्ड मागितले. डिपॉजिट म्हणून 10 हजार रुपये घेतले. मग ब्लॅकमेल करणे सुरु झाले . तुम्ही आमच्या अटींचे पालन केले नाही, दंड भरा असे प्रकार सुरु झाले. मुलीने वर्गातल्या मित्र – मैत्रिणींकडून उसने पैसे घेऊन एकूण 22 हजार रुपये  भरले. पैशासाठीचे ब्लॅकमेलिंग काही थांबेना, मग तिने घाबरत – घाबरत मला सांगितले. आम्ही सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. ब्लॅकमेलिंग थांबले , मात्र पैसे परत मिळू शकले नाही. 

तात्पर्य – फसव्या जाहिरातींना बळी पडू नका

प्रसंग सात – परदेशातून संशयास्पद पार्सल 

पुण्यातील एका डॉक्टर महिलेला फोन आला, विमानतळावरुन  अधिकारी बोलतो आहे. परदेशातून तुमचे एक पार्सल आले आहे, पण त्यात ड्रग्ज आहेत. तुम्हाला अटक होईल,इन्स्पेक्टर साहेबांशी बोला. फोनवर कडक आवाज येतो, प्रकरण गंभीर आहे, लवकर काय तो निर्णय घ्या.  प्रकरण दडपायचे तर दीड लाख पाठवा. त्या डॉक्टर महिलेने घाबरुन पैसे पाठविले. 

तात्पर्य – घाबरून कृती करू नका . 

प्रसंग आठ – तुमची पॉलिसी लॅप्स होत आहे

माझ्या मित्राचा मुलगा मुंबईत नोकरी करतो. एके दिवशी त्याला फोन आला. मी एचडीएफसी मधून बोलतो आहे. पाच वर्षापूर्वी तुम्ही एक पॉलिसी का॑ढली , त्याचे चार हप्ते भरले, पण पुढे हप्ते भरले नाही. तुमच्या एजंटनी तुम्हाला नीट माहिती दिली नसावी. तुमची पॉलिसी जिवंत आहे, तुम्हाला उरलेले  काही हप्ते भरल्यास साडेपाच लाख रुपये मिळू शकतात . त्याने मोबाईलवर कॉन्फरन्स कॉलव्दारे वरिष्ठ अधिका-याशीही बोलणे करुन दिले. मुलगा म्हणाला मला तर पॉलिसी काढल्याचे आठवत नाही. बँकेचा माणूस म्हणाला कदाचित तुमच्या वडीलांनी तुमच्या नावे पॉलिसी काढलेली असेल.  फायदा होतोय म्हणल्यावर मुलाने राहिलेले दीड लाखाचे हप्ते मिळालेल्या लिंकवर भरले भरले. त्यानंतर तो तथाकथित बँक कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी सारेच गायब झाले. 

 प्रसंग नऊ – मौज पडली महागात 

परवाच वृत्तपत्रात बातमी होती. निवृत्त झालेल्या एका अभियंत्याला फेसबुकवर एका सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली, त्याने ती आनंदाने स्वीकारली. मग, त्यांचे चॅटिंग सुरु झाले . आठ दिवसातच मुलीने विश्वास संपादन केला. मग खाजगी, अश्लील चॅटिंग सुरु झाले. मुलीचा पोर्न व्हिडिओही त्याने पाहिला. तिने विनंती केली, तू एकदा नग्न होऊन हस्तमैथून दाखव. त्याने तसे केले. मग हे रेकॉडिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन  ब्लॅकमेलिंग सुरु झाले. ब्लॅकमेलरने  दीड लाख उकळले. नंतर मुलीने आत्महत्या केली  असे सांगून पुन्हा ब्लॅकमेल केले. 

तात्पर्य – रंगबाजी टाळा

प्रसंग दहा –  फोन दुरुस्ती

एका आजीबाईने मोबाईल फोन दुरुस्तीला दिला . त्यात सिम कार्ड देखील होते . फोन दुरुस्त होऊन मिळाला . काही दिवसांनी आजीबाईंच्या बँक खात्यातील थोडे – थोडे  करत आठ लाख रुपये गायब झाले .

तात्पर्य – मोबाईल सिमसह दुरुस्तीला देऊ नका . 

प्रमाण वाढले

 ही मोजकी उदाहरणे आहेत. पूर्वी  तीन – चार महिन्यातून एखाद्याच्या वाट्याला असा अनुभव यायचा .आता प्रत्येकाला  आठवड्यातून दोनदा तरी  असा अनुभव येतो. यावरुन फसवणुकीच्या या व्यवहारात किती लोक सामील असतील याचा अंदाज येतो. हे लोक तंत्रज्ञानामध्ये खूप पुढे गेलेले आहेत .प्रसंगी सीबीआयच्या लेटरहेडवर पत्र पाठवणे , कस्टमच्या लेटरहेडवर पत्र पाठवणे अथवा ई-मेल पाठवणे असे प्रकार केले जात आहेत .ही माणसे परराज्यातून, परदेशातून  असे व्यवहार करतात. त्यांना शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. 

दररोज सात हजार तक्रारी

जानेवारी ते एप्रिल 2024 दरम्यान भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने चालवलेल्या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर 7 लाख 40 हजारांहून अधिक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत.  2024 च्या पहिल्या चार महिन्यांत भारतीयांचे सायबर गुन्हेगारांनी 1,750 कोटी रुपयांना गंडविले आहे. . इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या मते, मे 2024 मध्ये दररोज सरासरी 7,000 सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या, त्यापैकी 85% आर्थिक गुन्हेगारीच्या तक्रारी आहेत. ज्यांनी सायबर पोलिसांकडे  तक्रारी केल्या, त्यापैकी दहा टक्के लोकांचेही पैसे परत मिळाले नाही .त्यामुळे आधीच काळजी घेणे हे हितावह आहे .

ऑनलाईन फसवणूक टाळण्यास खालील काळजी घ्या .

1 . सावध रहा; घोटाळेबाज विश्वासार्ह वाटण्यासाठी  खूप प्रयत्न करतात, म्हणून एखाद्या व्यक्तीशी किंवा ऑफरशी संलग्न होण्यापूर्वी नीट विचार करा.

2. अनोळखी लिंक उघडू नकाः बँक कधीच लिंक पाठवत नाही त्यामुळे बँकेकडून लिंक पाठवली आहे असे म्हणणाऱ्यांना प्रतिसाद देऊन अनोळखी लिंक उघडू नका .

3. लोभ टाळा ; थोड्या दिवसात मोठा आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या अनेक योजना फसवणूक करणारे लोक सांगत असतात .असे योजनांना बळी पडू नका . लोभ टाळा .

4. घाईघाईने प्रतिसाद देऊ नका : ऑनलाईन फसवणूक करणारे लोक काहीतरी बहाणे करून ‘तुम्हाला घाईने कृती करण्यास सांगतात . वेळ घेऊन , वस्तुस्थिती तपासून निर्णय घ्या 

5. तुमच्या कार्डची सुरक्षा सेटिंग्ज तपासा; ग्राहकांची खाती आणि कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी बँका अनेक प्रकारचे सुरक्षा रक्षक प्रदान करतात. दररोज जास्तीत जास्त पैसे काढण्याची मर्यादा सेट करा, कार्ड चार्ज झाल्यावर सूचना प्राप्त करा आणि काही सेकंदात कार्ड लॉक करा.

*सामान्य सुरक्षा*

6. वैयक्तिक माहितीः फेसबुक, व्टिटर यासारखे समाज माध्यमावर वैयक्तिक माहिती शेअर करताना सावध रहा. प्रोफाईल लॉक करा .योग्य वाटणार व्यक्तीचेच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारा .

7. पासवर्ड : क्रेडिट, डेबिट कार्डसाठी  जन्मतारखेशी निगडित, सोपे पासवर्ड ठेऊ नका मजबूत पासवर्ड वापरा.

8. विश्वसनीय प्लॅटफॉर्म वापरा : ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना  विश्वसनीय असलेले पेमेंट प्लॅटफॉर्म वापरा.

9.  ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्या : शॉपिंग करायची असेल  त्यावेळी प्रतिष्ठित वेबसाइटवर खरेदी करा.अनोळखी ऑनलाईन शॉपिंग करून खरेदी करणे टाळा .

10 . अँटीव्हायरस :तुम्ही वापरत असलेल्या  गॅजेटमध्ये नेहमी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments