चेन्नई – सी जोसेफ विजय यावेळच्या निवडणुकीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री होतील असे भविष्य वर्षभरापूर्वी वर्तविलेल्या ज्योतिषाला मुख्यमंत्री विजय यांनी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नेमले आहे .
सोमवारी जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत सरकारी आदेशानुसार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची ‘मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी’ (OSD – राजकीय) म्हणून नियुक्ती केली आहे.या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, “श्री. रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची ‘मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी’ (OSD – राजकीय) म्हणून, त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून प्रभावी ठरेल अशा प्रकारे नियुक्ती करण्यात येत आहे.” तसेच, या नियुक्तीच्या सविस्तर अटी आणि शर्ती स्वतंत्रपणे जारी केल्या जातील, असेही यात पुढे म्हटले आहे.
विजय सत्तेवर येतील, अशी भविष्यवाणी एक वर्षापूर्वी याच व्यक्तीने केली होती.राजकीय वर्तुळात रिकी राधन पंडित हे विजय यांच्याशी संबंधित ज्योतिषी म्हणून सर्वश्रुत आहेत. गेल्या काही वर्षांत, या अभिनेत्यातून राजकारणी बनलेल्या नेत्याच्या महत्त्वाच्या राजकीय आणि वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये रिकी राधन पंडित हे त्यांच्यासोबत दिसून आल्याचेही वृत्त आहे.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, आपली राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या विजय यांच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड समोर आली आहे. ‘OSD’ (विशेष कार्य अधिकारी) या पदाच्या कार्यकक्षेत प्रामुख्याने राजकीय समन्वय साधणे, संपर्क आणि दुवा म्हणून काम करणे, तसेच थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित असलेल्या कामांची जबाबदारी सांभाळणे या बाबींचा समावेश असतो.

