Friday, July 17, 2026
Homeशिक्षणबातम्याजिंद ते सोनीपत मार्गावर धावली पहिली भारतीय हायड्रोजन रेल्वे

जिंद ते सोनीपत मार्गावर धावली पहिली भारतीय हायड्रोजन रेल्वे

जिंद (हरियाणा ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान भारताच्या पहिल्या हायड्रोजन-संचालित रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला.

पहिल्या हायड्रोजन-संचालित रेल्वेगाडीची सुरुवात ही रेल्वे क्षेत्रात स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था स्वीकारण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

ही रेल्वे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रियेतून वीज तयार करते. ती वीज मोटर्सना पुरवली जाते. त्यामुळे डिझेल जळत नाही आणि प्रदूषण अत्यल्प राहते.

भारतीय रेल्वेने आपल्या पहिल्या स्वदेशी हायड्रोजन-चलित ट्रेनच्या (आघाडीच्या) शुभारंभामुळे स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीच्या एका नवीन युगात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शून्य-उत्सर्जन (zero-emission) करणाऱ्या आणि १० डब्यांच्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले; ही ट्रेन हरियाणातील उत्तर रेल्वेच्या जिंद-सोनिपत या ८९ किमीच्या मार्गावर धावली आहे.यामुळे, हायड्रोजन-चलित रेल्वे वाहतुकीचा शोध घेणाऱ्या किंवा त्या दिशेने पावले टाकणाऱ्या निवडक देशांच्या गटात भारत सामील झाला आहे. या गटात जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांसारख्या देशांचा समावेश आहे.

याप्रसंगी, पंतप्रधानांनी हरियाणातील १२ हजार ४७० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणीही केली. श्री मोदी यांनी १५७ किलोमीटर लांबीच्या दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेचे (महामार्गाचे) लोकार्पण केले.

हा ‘ग्रीनफील्ड कॉरिडॉर’ ६६७ किलोमीटर लांबीच्या दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेचाच एक भाग आहे. या महामार्गामुळे दिल्ली आणि कटरा यांच्यातील प्रवासाचा वेळ सुमारे १४ तासांवरून कमी होऊन सहा तासांवर येईल, तसेच दिल्ली-अमृतसर प्रवासाचा वेळही सुमारे आठ तासांवरून चार तासांवर येईल.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या बारा वर्षांत भारतीय रेल्वेमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. त्यांनी नमूद केले की, हरियाणाने अलीकडच्या काळात विकासाचा एक नवीन टप्पा अनुभवला असून ते प्रगतीच्या मार्गावर आगेकूच करत आहे. श्री मोदी पुढे म्हणाले की, देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेगाडीच्या सुरुवातीमुळे भारताच्या इतिहासात जिंदला एक विशेष स्थान मिळाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments