नवी दिल्ली – ‘ऑईल इंडिया लिमिटेड’ने अंदमान समुद्रात खोदलेल्या एका शोध-विहिरीत नॅचरल गॅस ( नैसर्गिक वायू ) चा साठा शोधून काढला आहे. भारताच्या समुद्रकिनाऱ्या लगतच्या शोधमोहिमेतील ही एक महत्त्वपूर्ण घडामोड असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी जाहीर केले.
हा शोध ‘श्री विजयपुरम-३’या विहिरीत लागला आहे. ही विहीर अंदमान बेटांच्या पूर्व किनारपट्टीपासून सुमारे १५ किमी अंतरावर आणि ३५५ मीटर पाण्याच्या खोलीवर स्थित आहे. ‘इओसीन’ भूगर्भीय रचनेमध्ये १,९०० मीटरपेक्षा जास्त खोलीपर्यंत ही विहीर खोदण्यात आली होती; तेथे प्राथमिक उत्पादन चाचणीदरम्यान सतत होणाऱ्या ‘फ्लेअरिंग’मुळे (वायू जाळून पाहण्याच्या प्रक्रियेमुळे) नैसर्गिक वायूच्या अस्तित्वाचे संकेत मिळाले.
“अंदमान समुद्रात ऊर्जेच्या संधींचा एक महासागर बळकट झाला आहे! ‘ऑईल इंडिया लिमिटेड’ने अंदमान बेटांच्या पूर्व किनारपट्टीपासून १५ किमी अंतरावर आणि ३५५ मीटर पाण्याच्या खोलीवर खोदलेल्या ‘श्री विजयपुरम-३’ या शोध-विहिरीत नैसर्गिक वायूचा साठा आढळल्याची माहिती देताना मला खूप आनंद होत आहे. ‘इओसीन’ रचनेमध्ये १९०० मीटरहून अधिक खोलीवर घेतलेल्या प्राथमिक उत्पादन चाचणीदरम्यान, सततच्या ‘फ्लेअरिंग’द्वारे नैसर्गिक वायूचे अस्तित्व सिद्ध झाले आहे,” असे पुरी यांनी ‘एक्स’ (X) वरील एका निवेदनात म्हटले आहे.
ही घडामोड सरकारच्या ‘समुद्र मंथन मिशन’ (राष्ट्रीय खोल-समुद्र अन्वेषण मोहीम) अंतर्गत येत आहे; भारताच्या ऑफशोर (समुद्रातील) क्षेत्रांमध्ये खोल-समुद्र आणि अति-खोल-समुद्र अन्वेषण विस्तारण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग म्हणून ही मोहीम जाहीर करण्यात आली होती.कंपनीच्या माहितीनुसार, अंदमान बेसिनमध्ये सध्या सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान खोदण्यात आलेल्या तीन शोध-विहिरींपैकी (exploratory wells) दोन विहिरींमध्ये हायड्रोकार्बनची उपस्थिती आढळून आली आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी पुढे सांगितले की, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ च्या स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेल्या ‘समुद्र मंथन मिशन’ (राष्ट्रीय खोल-समुद्र अन्वेषण मोहीम) अंतर्गत, आपल्या हायड्रोकार्बन साठ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी ऑफशोर क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येने खोल-समुद्र आणि अति-खोल-समुद्र शोध-विहिरी खोदण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अंदमान बेसिनमध्ये ‘ऑईल’ (OIL) द्वारे सध्या राबविल्या जात असलेल्या शोध मोहिमेत खोदण्यात आलेल्या ३ शोध-विहिरींपैकी २ विहिरींमध्ये हायड्रोकार्बनची उपस्थिती आढळून आली आहे.”

